शारजाह, 31 ऑक्टोबर : हैदराबाद (SRH)ने बँगलोर (RCB)चा पराभव केल्यामुळे आयपीएल (IPL 2020)च्या प्ले-ऑफचा घोळ आणखी वाढला आहे. बँगलोरने दिलेलं 121 रनचं आव्हान हैदराबादने 5 विकेट गमावून 14.1 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. ऋद्धीमान सहाने सर्वाधिक 39 रन केले, तर मनिष पांडेने 19 बॉलमध्ये 26 रन आणि जेसन होल्डरने 10 बॉलमध्ये नाबाद 26 रन केले. बँगलोरकडून युझवेंद्र चहलने 2 विकेट घेतल्या, तर वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि इसरु उडाना यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर हैदराबादच्या बॉलरनी बँगलोरला 120 रनवरच रोखलं. संदीप शर्मा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर नटराजन, नदीम आणि राशिद खानला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. बँगलोरकडून जॉस फिलिपला सर्वाधिक 32 रन करता आले.
हैदराबादच्या या विजयामुळे प्ले-ऑफचा घोळ आणखी वाढत चालला आहे. प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारी मुंबई ही एकमेव टीम आहे. तर उरलेल्या 3 जागांसाठी 6 टीममध्ये स्पर्धा आहे. चेन्नईची एकमेव टीम स्पर्धेतून बाहेर झाली आहे. बँगलोरविरुद्धच्या विजयासोबतच हैदराबाद पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचलं आहे.
पॉईंट्स टेबलमध्ये बँगलोरची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. बँगलोरने 13 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. बँगलोरप्रमाणेच दिल्लीनेही 7 मॅच जिंकल्या आणि 6 मॅच हरल्या, पण बँगलोरचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते दुसऱ्या आणि दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
हैदराबाद, पंजाब, राजस्थान, कोलकाता या चारही टीमनी 13 पैकी 6 मॅच जिंकल्या तर 7 मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पॉईंट्स टेबलची ही परिस्थिती बघता मुंबई वगळता इतर सगळ्याच टीमचं टेन्शन आता वाढलेलं असणार आहे.