दुबई, 11 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमाची चॅम्पियनही मुंबई (Mumbai Indians) ची टीम ठरली आहे. यावर्षीच्या आयपीएल फायनलमध्ये मुंबईने दिल्ली (Delhi Capitals)चा 5 विकेटने पराभव केला. रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने दिल्लीने दिलेलं 157 रनचं आव्हान 5 विकेट गमावून 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली. ओपनर मार्कस स्टॉयनिस पहिल्याच बॉलला आऊट झाला. बोल्टने मॅचच्या पहिल्याच बॉलला विकेट घेतल्यानंतर लगेचच त्याने त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये रहाणेलाही माघारी धाडलं. यानंतर लगेचच शिखर धवनला जयंत यादवने आऊट केलं. शिखर धवनला या मॅचमध्ये 15 रनच करता आले. त्यामुळे शिखर धवनची ऑरेंज कॅप पटकावण्याची संधी हुकली.
दिल्लीच्या टीमने या मॅचसाठी त्यांच्या टीममध्ये कोणताच बदल केला नव्हता, तर मुंबईने राहुल चहरच्याऐवजी जयंत यादवला टीममध्ये घेतलं. जयंत यादवने मुंबईचा हा निर्णय योग्य ठरवला आणि धोकादायक शिखर धवनला स्वस्तात आऊट केलं. मुंबईविरुद्धच्या आयपीएल फायनलमध्ये 13 बॉल खेळून 15 रन करणाऱ्या शिखर धवन (Shikhar Dhawan) याचं ऑरेंज कॅप जिंकण्याचं स्वप्न धुळीला मिळालं. याचसोबत ही ऑरेंज कॅप पंजाब (KXIP)चा कर्णधार केएल राहुल याच्याकडे राहणार हे निश्चित झालं. आयपीएलच्या संपूर्ण मोसमात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते.
राहुलला ऑरेंज कॅप
केएल राहुल (KL Rahul) याने या मोसमात 14 मॅचमध्ये 55.83 ची सरासरी आणि 129.34 च्या स्ट्राईक रेटने 670 रन केले. या स्पर्धेत राहुलने एक शतक आणि पाच अर्धशतकंही झळकावली.
शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर
तर या यादीत शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर राहिला. धवनने 17 मॅचमध्ये 44.14 च्या सरासरीने आणि 144.73 च्या सरासरीने 618 रन केले. या आयपीएलमध्ये त्याने 2 शतकं आणि 4 अर्धशतकंही केली.
वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर
हैदराबाद (SRH)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. वॉर्नरने यावर्षी 16 मॅचमध्ये 39.14 च्या सरासरीने आणि 134.64 च्या स्ट्राईक रेटने 548 रन केल्या. या स्पर्धेत वॉर्नरने 4 अर्धशतकंही ठोकली.