अबु धाबी, 21 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात बँगलोर (RCB) ची शानदार कामगिरी सुरूच आहे. कोलकाता (KKR) विरुद्धच्या मॅचमध्ये विराट (Virat Kohli)च्या बँगलोरचा अगदी सहज विजय झाला. कोलकात्याने ठेवलेलं 85 रनचं आव्हान बँगलोरने 2 विकेट गमावून 13.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. कर्णधार विराट कोहली 18 रनवर नाबाद आणि गुरुकिरत मान 21 रनवर नाबाद राहिला. कोलकात्याकडून लॉकी फर्ग्युसनला देवदत्त पडिकलची एक विकेट मिळाली, तर एरॉन फिंच रन आऊट झाला.
या मॅचमध्ये कोलकात्याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. पण बँगलोरच्या बॉलिंगपुढे कोलकात्याच्या बॅट्समननी गुडघे टेकले. मोहम्मद सिराजने सुरुवातीच्या 2 ओव्हर मेडन टाकून 3 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये दोन ओव्हर मेडन टाकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. सिराजने त्याच्या 4 ओव्हरमध्ये 8 रन देऊन 3 विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहलला 2, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. कोलकात्याकडून इयन मॉर्गनने सर्वाधिक 30 रन केले. 20 ओव्हर बॅटिंग करून 84-8 एवढा स्कोअर केला. आयपीएल इतिहासात 20 ओव्हर बॅटिंग केल्यानंतरचा हा सगळ्यात कमी स्कोअर आहे.
कोलकात्याविरुद्धच्या या विजयामुळे बँगलोरची टीम पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. बँगलोरने 10 मॅचपैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवला, तर त्यांना 3 मॅच गमवाव्या लागल्या. या निकालानंतर दिल्ली पहिल्या क्रमांकावर कायम आहे, तर बँगलोर दुसऱ्या आणि मुंबई तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. कोलकाता नाईट रायडर्सनी 10 पैकी 5 मॅच जिंकल्या, तर 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकात्याची टीम चौथ्या क्रमांकावर कायम आहे.