दुबई, 8 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होणार आहे. आयपीएल फायनल झाल्यानंतर 32 जणांची भारतीय टीम युएईवरून थेट सिडनीला जाणार आहे. बीसीसीआयने खेळाडूंसाठी दुबईमध्येच बायो बबल तयार केलं आहे.
आयपीएलच्या ज्या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या नाहीत, त्यांच्यातले बहुतेक सगळे खेळाडू भारतात परतले आहेत, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेले खेळाडू बायो बबलमध्येच सराव करत आहेत. भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ची तिन्ही फॉरमॅटमध्ये निवड झाली आहे. चेन्नईची टीम आयपीएलमधून बाहेर पडल्यामुळे जडेजा टीम इंडियाच्या बायो बबलमध्ये आला आहे.
रविंद्र जडेजाने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सोबतचा टीम इंडियाच्या ट्रेनिंगचा फोटो 7 नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर शेयर केला. यावरुन शिखर धवनने जडेजा आणि रहाणेवर निशाणा साधला. अजिंक्य रहाणे दिल्ली (Delhi Capitals)च्या टीममध्ये आहे. रविवारी दिल्ली आणि हैदराबाद यांच्यामध्ये प्ले-ऑफची मॅच होणार आहे. पण त्याआधीच रहाणे टीम इंडियासोबत दिसला.

रविंद्र जडेजाने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या या फोटोवर शिखर धवनने कमेंट केली. अजिंक्य रहाणे तुझ्यासोबत सरावासाठी कसा आला? आमची उद्या (रविवारी) मॅच आहे, अशी कमेंट धवनने केली. धवनच्या या कमेंटवर जडेजानेही प्रत्युत्तर दिलं. पिंक बॉल टेस्ट आहे, त्यामुळे रहाणे रात्री सरावासाठी आल्याचं जडेजा म्हणाला. ऍडलेडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डे-नाईट टेस्ट गुलाबी बॉलने खेळवली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.