दुबई, 25 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू हे सध्या युएईमध्ये आयपीएल (IPL 2020) खेळत आहेत. आयपीएल संपल्यानंतर हे खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पण भारतीय टेस्ट टीममध्ये खेळणारे चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी हे आयपीएलमध्ये खेळत नाहीत, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यासाठी तेदेखील भारतातून युएईमध्ये जाणार आहेत. या दोघांबरोबर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड, बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण आणि फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर हेदेखील युएईला रवाना होतील.
खेळाडू आणि प्रशिक्षक दुबईमध्ये पोहोचल्यानंतर तिथल्या नियमांनुसार 6 दिवसांसाठी क्वारंटाईन होतील. तसंच नियमित कालावधीनंतर या सगळ्यांची कोरोना टेस्टही करण्यात येईल. युएईमध्ये येणारे खेळाडू आणि प्रशिक्षक आयपीएलच्या जैव सुरक्षित वातावरणाचा भाग नसतील, तर त्यांना वेगळं ठेवलं जाईल.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मर्यादित ओव्हरची सीरिज सिडनी आणि कॅनबेरामध्ये खेळवली जाईल, कारण न्यू साऊथ वेल्स सरकारने भारतीय टीमच्या आगमनानंतर अनिवार्य क्वारंटाईन कालावधीच्या दरम्यान सरावाला परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत तीन टी-20, तीन वनडे आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. भारतीय निवड समितीने या दौऱ्यासाठीच्या टीमची अजून घोषणा केलेली नाही.
बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया या वेळापत्रकाला अंतिम मंजुरी मिळत नाही तोपर्यंत टीमची निवड होणार नाही, असं सांगितलं जात आहे. निवड समितीसाठी टीम निवडणं ही फक्त औपचारिकता आहे, कारण निवड समिती सदस्यांची टीम निवडीबाबत चर्चा झाली आहे. तिन्ही फॉरमॅटच्या टीमसाठी पुढच्या आठवड्यात टीमची निवड होईल, असा अंदाज आहे.
10 नोव्हेंबरला आयपीएल संपल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होतील. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारतीय टीम जास्त खेळाडूंसह ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुजारा आणि विहारी हे दोघंही टेस्ट टीमचे खेळाडू असल्यामुळे ते आयपीएल खेळत नाहीत, म्हणून ते युएईला जाणार आहेत.