आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात आणखी एका जबरदस्त कॅचची भर पडली आहे. मुंबई (Mumbai Indians)विरुद्धच्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)च्या मनिष पांडेने अफलातून कॅच पकडला.
शारजाह : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात आणखी एका जबरदस्त कॅचची भर पडली आहे. मुंबई (Mumbai Indians)विरुद्धच्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)च्या मनिष पांडेने अफलातून कॅच पकडला. संदीप शर्माच्या बॉलिंगवर मनिष पांडेने इशान किशनला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
मनिष पांडे (Manish Pandey)ने संदीप शर्माच्या शेवटच्या बॉलवर लॉन्ग ऑनवर उडी मारून हा कॅच टिपला. इशान किशनने मारलेला बॉल बाऊंड्रीच्या बाहेर जाईल, असं वाटत असतानाच मनिष पांडे धावत आला आणि त्याने उडी मारत बॉल पकडला. एवढा भन्नाट कॅच पकडल्यानंतरही मनिष पांडे फारसा खुश दिसला नाही, कारण फिल्डिंग करत असताना आधी त्याने चुका केल्या होत्या.
मनिष पांडेने या मॅचमध्ये मुंबईचा ओपनर क्विंटन डिकॉकचा कॅच सोडला होता. क्विंटन डिकॉकने या मॅचमध्ये 39 बॉलमध्ये 67 रन ठोकले. हैदराबादच्या पराभवाचं हेही एक कारण ठरलं.
शारजाहमध्ये झालेल्या या मॅचमध्ये मुंबईने 20 ओव्हरमध्ये 208 रन केले. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादनला 20 ओव्हरमध्ये 174 रनपर्यंतच मजल मारता आली. यामुळे मुंबईचा 34 रननी विजय झाला. याचसोबत मुंबई पॉईंट्स टेबलमध्येही अव्वल क्रमांकावर पोहोचली. शारजाहच्या या मैदानात या मोसमात लागोपाठ 7व्यांदा 200 पेक्षा जास्तचा स्कोअर झाला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच या विक्रमाची नोंद झाली आहे.