अबु धाबी, 8 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातल्या फायनलच्या दोन्ही टीम ठरल्या आहेत. क्वालिफायरच्या दुसऱ्या मॅचमध्ये दिल्ली (Delhi Capitals)ने हैदराबाद (SRH)चा पराभव करत फायलनमध्ये प्रवेश केला. तर मुंबई (Mumbai Indians)ने याआधीच फायनल गाठली. यामुळे 10 नोव्हेंबरला मुंबई आणि दिल्ली यांच्यामध्ये आयपीएलची फायनल रंगणार आहे. या महामुकाबल्यामध्ये दोन्ही मुंबईकर कर्णधार एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. लहानपणापासूनच मुंबईच्या मैदानांवर क्रिकेटचे धडे गिरवणारे रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)या दोन्ही मुंबईकरांमध्ये आयपीएल ट्रॉफी मिळवण्यासाठी लढत होणार आहे.
दिल्लीची टीम पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. तर मुंबई सहाव्यांदा आयपीएलची फायनल खेळणार आहे. याआधीच्या 5 फायनलपैकी 4 फायनलमध्ये मुंबईचा विजय झाला, तर एका फायनलमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. 2010 साली पहिल्यांदा मुंबई आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली होती, पण त्यांना चेन्नईकडून पराभूत व्हायला लागलं. यानंतर मात्र मुंबईने मागे वळून पाहिलं नाही. 2013, 2015, 2017 आणि 2019 या वर्षी आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सर्वाधिक 4 वेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रमही मुंबईच्या नावावर आहे. या सगळ्या आयपीएलमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच होता. त्यामुळे सर्वाधिक आयपीएल जिंकणाऱ्या कर्णधाराचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे.
मुंबई-दिल्लीचं रेकॉर्ड
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात झालेल्या तिन्ही मॅचमध्ये मुंबईने दिल्लीचा पराभव केला होता. यातल्या दोन मॅच लीग स्टेजमध्ये तर एक पहिली क्वालिफायरची मॅच होती. यावर्षीच्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईने दिल्लीवर 5 विकेटने, दुसऱ्या मॅचमध्ये 9 विकेटने आणि क्वालिफायरच्या मॅचमध्ये 57 रनने विजय मिळवला होता.
आयपीएल इतिहासात मुंबई आणि दिल्ली यांच्यामध्ये आतापर्यंत एकूण 27 सामने झाले आहेत, यापैकी 15 मॅचमध्ये मुंबईचा तर 12 मॅचमध्ये दिल्लीचा विजय झाला आहे. त्यामुळे आकडेवारीवर नजर टाकली तर मुंबईचीच टीम दिल्लीवर भारी पडल्याचं पाहायला मिळत आहे.