दुबई, 14 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या या हंगामात मुंबई (Mumbai Indians)ची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रविवारी दिल्ली (Delhi Capitals)चा पराभव करुन मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली. दिल्लीविरुद्धच्या या मॅचमध्ये मुंबईचा 5 विकेटने विजय झाला. या मॅचनंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)ने त्याच्या खेळाडूंचं कौतुक केलं, पण तेव्हाच रोहितने काही गोष्टींबाबत चिंताही व्यक्त केली.
मुंबईचा ओपनर क्विंटन डिकॉकला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. डिकॉकने 53 रन केले, तर सूर्यकुमार यादवनेही डिकॉक एवढ्याच रन केल्या. दिल्लीने केलेल्या 162/4 च्या स्कोअरचा पाठलाग करताना मुंबईने 19.4 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 166 रन केले. दिल्लीच्या टीमने या मॅचमध्ये 10-15 रन कमी केल्याचं त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यरने मान्य केलं.
रोहितला चिंता
'आम्ही कशाप्रकारचं क्रिकेट खेळत आहोत, ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला पुढे जाताना आत्मविश्वास मिळतो. स्पर्धेच्या पहिल्या भागात आमच्या खेळामुळे मी खुश आहे. आज आम्ही सगळं योग्य केलं. आम्ही चांगली बॉलिंग केली आणि बॅट्समननीही चांगली कामगिरी केली. पण आम्हाला शेवट म्हणावा तसा करता आला नाही. मैदानात टिकलेला बॅट्समन शेवटपर्यंत मैदानात टिकला पाहिजे, याबाबत आम्ही आग्रही आहोत, कारण तो मैदानातली परिस्थिती बऱ्यापैकी जाणून असतो,' असं रोहित म्हणाला.
'स्पर्धेत आव्हानाचा पाठलाग करणं अनेक टीमना आवडत नाही. पण आम्ही जी कामगिरी केली, त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही कोणत्याही आव्हानाचा पाठलाग करु शकतो,' अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली.