अबु धाबी, 16 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये मुंबईन (Mumbai Indians)ने पुन्हा एकदा कोलकाता (Kolkata Knight Riders)ला पराभवाची धूळ चारली आहे. कोलकात्याने ठेवलेल्या 149 रनचं आव्हान मुंबईने 16.5 ओव्हरमध्येच फक्त 2 विकेट गमावून पूर्ण केलं. क्विंटन डिकॉकने 44 बॉलमध्ये नाबाद 78 रन केले. कोलकात्याने दिलेल्या लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या क्विंटन आणि रोहित शर्माच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 94 रनची पार्टनरशीप केली. रोहित शर्मा 36 बॉलमध्ये 35 रन करुन आऊट झाला, तर सूर्यकुमार यादव 10 रन करून माघारी परतला. हार्दिक पांड्याने 11 बॉलमध्ये नाबाद 21 रन केले. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावीला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
दिनेश कार्तिकने कोलकात्याचं नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे इयन मॉर्गनला कर्णधार करण्यात आलं आहे. पण पहिल्याच मॅचमध्ये मॉर्गनला पराभव पत्करावा लागला आहे. या मॅचमध्ये कोलकात्याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. मुंबईच्या बॉलरनी कोलकात्याला सुरुवातीपासूनच वारंवार धक्के दिले. कोलकात्याची अर्धी टीम 61 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतली होती, पण मॉर्गन आणि कमिन्सने त्यांचा डाव सावरला. कमिन्सने 36 बॉलमध्ये नाबाद 53 रन केले, तर मॉर्गनने 29 बॉलमध्ये नाबाद 39 रनची खेळी केली. मुंबईकडून राहुल चहरला 2 आणि बोल्ट, कुल्टर नाईल, बुमराहला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
यंदाच्या मोसमातला मुंबईचा कोलकात्यावरचा हा दुसरा विजय आहे. तर मुंबईने आतापर्यंत आयपीएल इतिहासात त्यांचा 21 वेळा पराभव केला आहे, तर दुसरीकडे केकेआरला मुंबईला फक्त 6 वेळा हरवण्यात यश आलं आहे.
या विजयासोबतच मुंबईची टीम पुन्हा पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. मुंबईने 8 मॅचपैकी 6 मॅच जिंकल्या आहेत, तर 2 मॅचमध्ये त्यामना पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे केकेआरने 8 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता चौथ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.