दुबई, 31 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या पहिल्या सामन्यात मुंबई (Mumbai Indians)ने दिल्ली (Delhi Capitals)वर दणदणीत विजय मिळवला आहे. सोबतच आता मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर कायम राहणार आहे, त्यामुळे त्यांना प्ले-ऑफमध्ये खेळण्याच्या दोन संधी मिळणार आहेत. दिल्लीने ठेवलेलं 111 रनचं माफक आव्हान मुंबईने 14.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. ईशान किशनने 47 बॉलमध्ये नाबाद 72 रन केले, तर क्विंटन डिकॉक 26 रनवर आणि सूर्यकुमार यादव 12 रनवर नाबाद राहिला. दिल्लीकडून एनिरक नॉर्कियाने 1 विकेट घेतली.
या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर ट्रेन्ट बोल्टने दिल्लीला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. यानंतर बुमराहनंही दिल्लीला सावरू दिलं नाही. बोल्ट आणि बुमराह यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर कुल्टर नाईल आणि राहुल चहरला प्रत्येकी 1-1 विकेट घेता आली.
या मॅचनंतर पॉईंट्स टेबलमध्ये फरक पडला नसला तरी या निकालामुळे पंजाब, राजस्थान, कोलकाता आणि हैदराबाद यांच्या आशा आणखी पल्लवीत झाल्या आहेत, कारण दिल्लीचा नेट रनरेट उणे झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मुंबईने 13 पैकी 9 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, तर दिल्लीने 13 पैकी 7 मॅच जिंकल्या असून त्यांचा 6 मॅचमध्ये पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाच्या मोसमातला दिल्लीचा हा लागोपाठ चौथा पराभव आहे.