अबु धाबी, 17 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या लिलावामध्ये बऱ्याच खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव होतो. यातल्या बऱ्याच खेळाडूंना त्यांच्या किंमतीला साजेशी अशी कामगिरी करता येत नाही. कित्येक वेळा तर अत्यंत कमी किंमतीमध्ये विकत घेतलेले खेळाडूही या कोट्याधीशांना लाजवेल अशी कामगिरी करतात. कोलकात्याचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्यासाठीही यंदाचा मोसमा निराशाजनकच म्हणावा लागेल.
पॅट कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)ने या मोसमात 15.50 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. आयपीएल इतिहासातली ही सगळ्यात मोठी बोली होती. याआधी बेन स्टोक्सला रायजिंग पुणे सुपरजायंट्सने 2017 साली 14.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
केकेआरने पॅट कमिन्सला त्याच्या भेदक बॉलिंगसाठी 15.50 कोटी रुपये देऊन विकत घेतलं, पण या मोसमात त्याला फक्त 2 विकेट घेता आल्या आहेत. पॅट कमिन्सने 8 मॅचमध्ये 125 ची बॉलिंग सरासरी आणि 8.62 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली आहे. कोलकात्याकडून यंदाच्या मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कमिन्स सातव्या क्रमांकावर आहे.
पॅट कमिन्सने बॉलिंगमध्ये निराशा केली असली तरी त्याने बॅटिंगमध्ये मात्र चांगली कामगिरी केली आहे. 8 मॅचच्या 7 इनिंगमध्ये कमिन्सने 31.50 ची सरासरी आणि 161.53 च्या सरासरीने 126 रन केले आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. शुक्रवारी मुंबईविरुद्ध झालेल्या मॅचमध्येच पॅट कमिन्सने अर्धशतक झळकावलं. कोलकाताची अवस्था 61-5 अशी झालेली असताना कमिन्सने कर्णधार इयन मॉर्गनच्या मदतीने टीमला 148 रनपर्यंत पोहोचवलं. या मॅचमध्ये कमिन्स कोलकात्याचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. कमिन्सने या मॅचमध्ये 147.22 च्या स्ट्राईक रेटने 36 बॉलमध्ये 53 रन केले, ज्यात 5 फोर आणि 2 सिक्सचा समावेश आहे. यंदाच्या मोसमात कोलकात्याकडून सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कमिन्स पाचव्या क्रमांकावर आहे.
पॅट कमिन्सने बॅटिंग करुन मोलाची कामगिरी केली असली, तरी त्याची मुख्य भूमिका बॉलरची आहे. त्यामुळे केकेआरला प्ले-ऑफ पर्यंत मजल मारायची असेल, तर कमिन्सला त्याच्या रकमेच्या साजेशी बॉलिंग करावी लागणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये सध्या कोलकात्याची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 8 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत, तर 4 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.