Home /News /sport /

IPL 2020 : आयपीएलचं मैदान गाजवून भारतीय क्रिकेटपटूने दुबईत घेतली कपिंग थेरपी

IPL 2020 : आयपीएलचं मैदान गाजवून भारतीय क्रिकेटपटूने दुबईत घेतली कपिंग थेरपी

आयपीएल (IPL 2020)ला युएईमध्ये दणक्यात सुरुवात झाली आहे.

    दुबई, 1 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)ला युएईमध्ये दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या 12 दिवसांमध्येच अनेक सामने शेवटच्या ओव्हरमध्ये गेले, तर काही सुपर ओव्हरही पाहायला मिळाल्या. यंदाच्या मोसमात बरेच भारतीय खेळाडू आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरत आहेत. यातलंच एक नाव म्हणजे मोहम्मद शमी (Mohammad Shami). यंदाच्या मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शमी दुसऱ्या क्रमांकावर आहे. शमीने 3 मॅचमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. युएईमध्ये मैदान गाजवत असतानाच मोहम्मद शमीने कपिंग थेरपी (cupping theropy)ही करून घेतली आहे. याचा फोटो शमीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेयर केला आहे. कपिंग थेरपीनंतर आराम वाटत आहे, असं ट्विटही त्याने केलं. गेल्या काही काळापासून कपिंग थेरपी सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय झाली आहे. मायकल फेल्प्स, नेमार, एंथनी जोशुआ, किम कार्दिशियान यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी कपिंग थेरपी घेतली आहे. काय असते कपिंग थेरपी? कपिंग थेरपी खेळाडू आणि मनोरंजन क्षेत्रातल्या सेलिब्रिटींमध्ये प्रसिद्ध आहे. या थेरपीचा वापर दुखण्यावर उपचार करण्यासाठी केला जातो. कपिंग थेरपी ही एक चायनिज थेरपी आहे. यात कपमध्ये व्हॅक्यूम बनवून शरिराच्या काही भागांमध्ये ठराविक वेळांसाठी लावले जातात. सक्शनसोबत ब्लड सर्क्युलेशनच्या माध्यमातून या थेरपीपासून अनेक प्रकारचे उपचार केले जातात. थेरपीची सुरुवात कुठून झाली? कपिंग थेरपीची सुरुवात जवळपास 2 हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये झाली होती. ही एक प्रकारची पारंपरिक आणि प्राचीन चिकिस्तक पद्धत आहे. कपिंगला अरबी संस्कृतीमध्ये हिजामा या नावानेही ओळखलं जातं. कप कशापासून तयार करतात? या थेरपीसाठी वापरण्यात येणारे कप काच, माती, बांबू, सिलिकॉन पासून बनवले जातात. कपिंग थेरपी ड्राय, वेट आणि फायर या 3 पद्धतीने केली जाते. ड्राय कपिंगमध्ये कोरडे कप शरिराच्या ठराविक ठिकाणी ठेवले जातात, ज्यामुळे कपच्या आतमध्ये व्हॅक्यूम तयार होईल. यामुळे शरिरातलं खराब रक्त एका ठिकाणी एकत्रित होतं. ज्याला नंतर टोचून बाहेर काढलं जातं. वेट कपिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांना कपमध्ये बुडवलं जातं. यानंतर या कपना त्वचेवर ठेवलं जातं. या पद्धतीमध्ये ताणलं गेल्यामुळे दुखण्यातून आराम मिळतो. तर फायर कपिंगमध्ये कापसाच्या बोळ्यांना दारूमध्ये बुडवून आग लावली जाते. यानंतर आगीतून निघणारा धूर कपमध्ये टाकला जातो. यानंतर कपला कंबर आणि खांद्यावर लावलं जातं. धुराच्या दबावामुळे त्वचा कपच्या आतमध्ये खेचली जाते. फायर कपिंगमुळे त्वचेच्या त्रासाला दूर केलं जाऊ शकतं. कपिंग थेरपीचे फायदे कपिंग थेरपीमुळे वय लपवायला, रक्ताभिसरण नीट करायला, दुखण्यातून आराम मिळवायला, शरिरातल्या विषारी गोष्टी काढायला, त्वचा सुंदर करायला मदत होते. सोबतच कंबर दुखी, स्लिप डिस्क, पायाची सूज या त्रासांसाठी कपिंग थेरपी फायद्याची असल्याचं सांगितलं जातं. कोणी घेतली कपिंग थेरपी? बॉक्सर एंथनी जोशुआ, अमेरिकने स्विमर मायकल फेल्प्स, फूटबॉलपटू नेमार, जिम्नॅस्ट अलेक्झांडर नाडौर, नताली कफलिन, इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अली, किम कार्दिशियान, पद्म लक्ष्मी, दिशा पटनी, उर्वशी रौतेला, बानी जे, विद्युत जमवाल, विक्टोरिया बेकहम, जस्टिन बिबर, टेनिसपटू अलेक्झांडर डोलगोपोलव यांच्यासारख्या दिग्गजांनी कपिंग थेरपी घेतली आहे. या सेलिब्रिटींनी कपिंग थेरपीनंतरचे आपले फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या