Home /News /sport /

IPL 2020 : आयपीएल जिंकली तरी मुंबई-दिल्लीला बसणार मोठा फटका

IPL 2020 : आयपीएल जिंकली तरी मुंबई-दिल्लीला बसणार मोठा फटका

आयपीएल (IPL 2020) च्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals) यांच्यात लढत होणार आहे. या मॅच विजय मिळवला तरी देखील दोन्ही टीमचं मोठं नुकसान होणार आहे.

    दुबई, 10 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals) यांच्यात लढत होणार आहे. या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला तर त्यांचा हा पाचवा आयपीएल विजय असेल, तर दुसरीकडे दिल्ली पहिल्यांदाच आयपीएल फायनल खेळत आहेत, त्यामुळे तेदेखील आपली पहिली आयपीएल जिंकण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतील. यंदाच्या वर्षी आयपीएल फायनल जिंकली तरी दोन्ही टीमला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. आयपीएल जिंकणाऱ्या टीमला 10 कोटी रुपये मिळणार आहेत, तर पराभूत टीमला 6.25 कोटी रुपये मिळतील. मागच्याचवर्षी ही रक्कम दुप्पट होती. 2019 साली विजेत्या टीमला 20 कोटी रुपये आणि दुसऱ्या क्रमांकाच्या टीमला 12.50 कोटी रुपये मिळाले होते. 2019 साली मुंबईने आयपीएल जिंकल्यामुळे त्यांना 20 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं होतं, तर फायलनमध्ये पराभव झालेल्या चेन्नईला 12 कोटी रुपये मिळाले होते. या मोसमात तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या हैदराबाद (SRH) आणि बँगलोर (RCB)ला प्रत्येकी 4.375 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने खर्चामध्ये कपात करण्याचा निर्णय मार्च महिन्यामध्येच घेतला, त्यामुळेच आयपीएलच्या पुरस्काराची किंमतही कमी करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक टीमची आर्थिक स्थिती चांगली आहे. नफा वाढवण्यासाठी त्यांच्याकडे स्पॉन्सर आणि इतर बरेच पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे पैशांची कपात करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. ऑरेंज-पर्पल कॅप विजेत्याला किती पैसे मिळणार? दुसरीकडे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्या खेळाडूला किती रक्कम मिळणार याबाबत अजून बीसीसीआयकडून काहीही स्पष्ट करण्यात आलं नाही. मोसमात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूचा गौरव ऑरेंज कॅपने आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. मागच्यावर्षी ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेत्या खेळाडूला प्रत्येकी 10-10 लाख रुपये देण्यात आले होते. यावर्षी पंजाब (KXIP)चा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने सर्वाधिक 670 रन केले आहेत. राहुलच्या मागे डेव्हिड वॉर्नर याने 546 रन केले आहेत, पण आता वॉर्नर मॅच खेळणार नसल्यामुळे ऑरेंज कॅप राहुलकडेच राहिल. तर पर्पल कॅप पटकवण्यासाठी दिल्लीचा कगिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराह यांच्यात स्पर्धा आहे. रबाडाने या मोसमात 29 विकेट आणि बुमराहने 27 विकेट घेतल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या