IPL 2020 : काल रात्री वडील गेले, आज मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरला
आयपीएल (IPL 2020)च्या पंजाब (KXIP) आणि हैदराबाद (SRH)यांच्या मॅचला सुरुवातच झाली ती वाईट बातमीने. पंजाबचा खेळाडू मनदीप सिंग (Mandeep Singh) याच्या वडिलांचं काल रात्री निधन झालं, पण तरीही आजच्या मॅचमध्ये तो मैदानात उतरला.
दुबई, 24 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या पंजाब (KXIP) आणि हैदराबाद (SRH)यांच्या मॅचला सुरुवातच झाली ती वाईट बातमीने. पंजाबचा खेळाडू मनदीप सिंग (Mandeep Singh) याच्या वडिलांचं काल रात्री निधन झालं, पण तरीही आजच्या मॅचमध्ये तो मैदानात उतरला. या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर पंजाबची टीम बॅटिंगसाठी उतरली तेव्हा मनदीप सिंग केएल राहुलसोबत बॅटिंगसाठी आला. 14 बॉलमध्ये 17 रन करुन मनदीप माघारी परतला. मनदीपच्या दु:खात सहभाग नोंदवण्यासाठी पंजाबची टीम आज दंडाला काळी पट्टी बांधून खेळत आहे.
मनदीप सिंग आयपीएलसाठी युएईला जाण्यापासूनच त्याचे वडील आजारी होते. मनदीप सिंग याच्या वडिलांचं निधन झाल्याच्या बातम्या कालपासून प्रसिद्ध होत होत्या, पण मनदीपच्या भावाने हे वृत्त फेटाळून लावलं होतं. अखेर पंजाबच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मनदीपच्या वडिलांच्या निधनाला अधिकृत दुजोरा दिला.
Lost his father last night, but Mandy’s out here to open!
मनदीप सिंग या सामन्यामध्ये मयंक अग्रवालला दुखापत झाल्यामुळे खेळत आहे. याआधी चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये मनदीपने छोटेखानी खेळी केली. पण यानंतर त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. त्यामुळे त्याला 3 मॅचनंतर टीममधून काढून टाकण्यात आलं. मनदीपने आजच्या मॅचआधी 11 च्या सरासरीने 33 रन केले.
मनदीप सिंगने 101 आयपीएल मॅचमध्ये 21.63 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राईक रेटने 1,579 रन केले आहेत. मनदीपने त्याच्या आयपीएल कारकिर्दीमध्ये 5 अर्धशतकं केली असून त्याचा सर्वाधिक स्कोअर 77 रन आहे.
त्याआधी आजच्या दिवसाच्या पहिल्या मॅचवेळी खेळणाऱ्या नितीश राणाच्या सासऱ्यांचाही काल मृत्यू झाला. नितीश राणा याने या मॅचमध्ये अर्धशतक करुन सासऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. नितीश राणाने अर्धशतक झाल्यानंतर सुरेंदर नावाची कोलकाता टीमची जर्सी झळकावली. सुरेंदर हे नितीश राणा याच्या सासऱ्यांचं नाव होतं.
नितीश राणाने दु:खाच्या या काळातही मैदानात उतरून टीमसाठी अर्धशतकी खेळी केली. या मोसमातली नितीशचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. ओपनिंगला बॅटिंगसाठी आलेल्या नितीशने 13 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने आणि 152 च्या स्ट्राईक रेटने 81 रन केले.