दुबई, 20 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नईची कामगिरी निराशाजनक झाली आहे. सोमवारी राजस्थान (Rajasthan Royals)ने चेन्नई (CSK)चा 7 विकेटने पराभव केला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणारी चेन्नईची टीम 20 ओव्हरमध्ये 125 रनच बनवू शकली. राजस्थानने हे आव्हान 17.3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पूर्ण केलं. चेन्नईने यंदाच्या मोसमात 10 पैकी फक्त 3 मॅचमध्येच विजय मिळवला आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यात फक्त 6 पॉईंट्सच आहेत. चेन्नईचं आता प्ले-ऑफमध्ये पोहोचणं जवळपास अशक्य झालं आहे.
राजस्थानविरुद्धच्या मॅचनंतर धोनीने या मोसमातल्या पराभवांची कारणं सांगितली. आमची प्रक्रिया नेमकी काय चुकली ते बघावं लागेल, कारण निकाल हा प्रक्रियेचा भाग आहे. जर तुम्ही प्रक्रियेवर लक्ष द्याल, तर निकालाचा दबाव ड्रेसिंग रुमवर पडणार नाही. धोनीच्या या प्रतिक्रियेवर भारताचे माजी क्रिकेटपटू क्रिस श्रीकांत (Kris Srikkanth)यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीकांत यांनी चेन्नईच्या खराब कामगिरीला धोनीला जबाबदार धरलं आहे. 'धोनीच्या प्रक्रियेबद्दलच्या गोष्टीशी मी सहमत नाही. तुम्ही प्रक्रियेचं बोलता, पण टीम निवडीची प्रक्रियाच चुकीची आहे. भारतीय खेळाडू दबाव सहन करु शकत नाहीत, हीच चेन्नईची समस्या आहे. रायुडूने मुंबईविरुद्धची पहिली मॅच जिंकवली, पण केदार जाधव, पियुष चावला आणि रविंद्र जडेजा चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत,' असं श्रीकांत म्हणाले.
धोनीने युवा खेळाडूंमध्ये स्पार्क कमी असल्याचं वक्तव्य केलं, पण या वक्तव्यावरही श्रीकांत यांनी टीका केली. श्रीकांत इंडिया टुडेशी बोलत होते. केदार जाधव आणि पियुष चावला यांच्यात काय स्पार्क दिसला? असा प्रश्न श्रीकांत यांनी विचारला, तसंच हे सगळं बकवास असल्याची टीकाही श्रीकांत यांनी केली.
'तुम्ही प्रक्रियेबद्दल बोलता बोलता स्पर्धा संपेल. जगदीशनने स्पार्क दाखवला, पण यानंतर त्याला संधीच मिळाली नाही. कर्ण शर्माला बाहेर बसवून पियुष चावलाला खेळवण्यात आलं, पण कर्ण शर्मा विकेट घेतल होता. दीपक चहर आणि जॉस हेजलवूडने सुरुवातीला विकेट घेऊन दिल्या, पण चावला आल्यानंतर एकही विकेट मिळाली नाही,' अशी प्रतिक्रिया श्रीकांत यांनी दिली.