IPL 2020 : 4 कोटी रुपयांच्या 'मिस्ट्री स्पिनर'समोर धोनीची दांडी गूल !

IPL 2020 : 4 कोटी रुपयांच्या 'मिस्ट्री स्पिनर'समोर धोनीची दांडी गूल !

यंदाच्या आयपीएल (IPL 2020) मध्ये चेन्नई (CSK)ची कामगिरी खराब झाली आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni)ही बॅटिंगमध्ये संघर्ष करताना दिसत आहे.

  • Share this:

अबु धाबी, 8 ऑक्टोबर : यंदाच्या आयपीएल (IPL 2020) मध्ये चेन्नई (CSK)ची कामगिरी खराब झाली आहे. आतापर्यंत झालेल्या 6 मॅचपैकी 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, तर त्यांना 2 मॅचच जिंकता आल्या आहेत. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni)ही बॅटिंगमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. बॅटिंगच्या क्रमात बदल केल्यानंतरही धोनीला सूर गवसलेला नाही. बुधवारी कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये धोनी चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. पण तरीही त्याला मोठी खेळी करता आली नाही. 11 रन करुन धोनी पॅव्हेलियनमध्ये परतला. कोलकात्याचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy)ने धोनीला बोल्ड केलं. या सामन्यात कोलकात्याने चेन्नईचा 10 रनने पराभव केला.

चेन्नईला शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 44 रन करायचे होते आणि त्यांच्या हातात 7 विकेट होत्या. त्यामुळे चेन्नईला विजय मिळवताना अडचण येणार नाही, असं वाटत होतं. कर्णधार धोनीही खेळपट्टीवर होता. 15 व्या ओव्हरमध्ये कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकने बॉल वरुण चक्रवर्तीच्या हातात दिला. धोनीने त्याला एकही फोर किंवा सिक्स न मारल्यामुळे कार्तिकने पुन्हा 17वी ओव्हरही चक्रवर्तीलाच दिली. धोनीने ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला फोर मारली. यानंतर धोनी मोठे शॉट्स खेळेल, असं वाटत होतं, पण पुढच्याच बॉलवर चक्रवर्तीने धोनीची दांडी गूल केली. स्लॉग स्विप करण्याच्या नादात धोनी सरळ बॉलवर बोल्ड झाला. धोनीच्या विकेटने ही मॅच फिरली आणि कोलकात्याला आशेचा किरण दिसला. धोनीच्या विकेटनंतर चेन्नई जिंकलेली मॅच हरली.

धोनीचा मिडास टच गायब?

यावर्षी धोनी त्याच्या बॅटिंगच्या जोरावर चेन्नईला एकही मॅच जिंकवून देऊ शकला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनी कित्येकवेळा नॉट आऊट राहिला आहे, पण तरीही चेन्नईला जिंकता आलं नाही. धोनीने या मोसमात 51 च्या सरासरीने 102 रन केले आहेत. आतापर्यंत 3 वेळा तो नाबाद राहिला, पण त्याला एकही अर्धशतक करता आलेलं नाही.

कोण आहे वरुण चक्रवर्ती?

वरुण चक्रवर्तीला कोलकात्याने मागच्या वर्षी झालेल्या लिलावात 4 कोटी रुपयांना विकत घेतलं. मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळख मिळवलेला वरुण चक्रवर्ती ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर आणि टॉप स्पिन टाकू शकतो. वरुणने वयाच्या 13व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 17 वर्षांपर्यंत तो विकेट कीपर बॅट्समन होता. यानंतर त्याला फार संधी मिळाली नाही, त्यामुळे त्याने चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठातून आर्किटेक्चरची पदवी मिळवली. नंतर तामीळनाडू प्रिमियर लीगमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर वरुणकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. आता वरुण आयपीएल खेळत आहे.

Published by: Shreyas
First published: October 8, 2020, 4:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या