दुबई, 31 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात कगिसो रबाडा (Kagiso Rabada)ला मागे टाकत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)ने पर्पल कॅप पटकावली आहे. दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या सामन्यात बुमराहने 4 ओव्हरमध्ये 14 रन देऊन 3 विकेट घेतल्या. याचसोबत बुमराहने या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत, त्यामुळे त्याला इनिंग संपल्यानंतर पर्पल कॅप देण्यात आली.
मुंबई (Mumbai Indians)चा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर बोल्टने सुरुवातीलाच दिल्लीच्या 2 विकेट घेतल्या, यानंतर मग बुमराहनेही त्यांना धक्के दिले. बुमराहने ऋषभ पंत, मार्कस स्टॉयनिस आणि हर्षल पटेल यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
दिल्लीविरुद्ध 3 विकेट घेताच बुमराहच्या नावावर या आयपीएलमध्ये 23 विकेट झाल्या आहेत. बुमराह आणि रबाडा या दोघांनीही 13 मॅचमध्ये 23 विकेट घेतल्या आहेत, पण बुमराहची सरासरी आणि इकोनॉमी रेट रबाडापेक्षा कमी असल्यामुळे बुमराहला पर्पल कॅप देण्यात आली. रबाडाने स्पर्धेत 8 रन प्रती ओव्हरच्या हिशोबाने आणि बुमराहने 6.96 रन प्रती ओव्हरच्या हिशोबाने रन दिल्या आहेत.
'पर्पल कॅप खेळाचाच भाग आहे, पण त्यापेक्षा जास्त 2 पॉईंटस आहेत. आमच्यासाठी पर्पल कॅपपेक्षा विजय जास्त महत्त्वाचा आहे,' असं बुमराह म्हणाला. तसंच 20 ओव्हरमध्ये कधीही गरज लागली तर मी बॉलिंग करायला तयार असतो, कारण मला आव्हान स्वीकारायला आवडतात, अशी प्रतिक्रिया बुमराहने दिली.