अबु धाबी, 16 ऑक्टोबर : दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)ने आयपीएल सुरु असतानाच कोलकाता (KKR)च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. कार्तिकच्याऐवजी इयन मॉर्गन (Eoin Morgan)कडे कोलकात्याचं नेतृत्व देण्यात आलं आहे. कार्तिक कर्णधार असताना या मोसमात कोलकात्याने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत. कार्तिकने त्याच्या बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कर्णधारपद सोडलं असल्याचं कोलकात्याने सांगितलं. पण अनेक क्रिकेटपटूंनी यावर नाराजी जाहीर केली आहे. भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण (Irfan Pathan) यानेही कार्तिकच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कोलकाता आणि मुंबई यांच्यातल्या मॅचआधी स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात कार्तिकच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर चर्चा झाली. कर्णधाराने स्पर्धा सुरू असतानाच नेतृत्व सोडलं तर त्याचा परिणाम टीमवर होतो. खेळाडू दबावात येतात आणि वातावरण खराब होतं. काय करायचं? हे खेळाडूंना कळत नाही, अशी प्रतिक्रिया इरफान पठाणने दिली.
कार्तिकच्या या निर्णयामागे इरफान पठाणने परदेशी प्रशिक्षकाचा मुद्दाही उचलला. ब्रॅण्डन मॅक्कलम कोलकात्याचा प्रशिक्षक आहे, जो विदेशी आहे. म्हणूनच मॉर्गनला नेतृत्व मिळालं असेल. जर केकेआरचा प्रशिक्षक भारतीय असता तर कार्तिकला कर्णधारपद सोडावं लागलं नसतं, असं इरफान पठाण म्हणाला.
दिनेश कार्तिकने सहा दिवसांपूर्वीच पंजाबविरुद्ध शानदार अर्धशतक केलं होतं, याचा उल्लेखही इरफानने केला. कोलकात्याने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत. त्यांच्याकडे 8 पॉईंट्स आहेत, त्यामुळे परिस्थिती एवढीही वाईट नाही. जर टीम प्ले-ऑफला पोहोचली तर सगळं श्रेय दिनेश कार्तिकलाच मिळालं असतं. एक मॅचआधीच कार्तिकला मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं, असं वक्तव्य इरफान पठाणने केलं.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कार्तिकने 7 मॅचमध्ये 108 रन केले आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. आयपीएलमध्ये कोलकात्याने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत. केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.