दुबई, 22 ऑक्टोबर : जगातली सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट स्पर्धा म्हणून आयपीएल (IPL 2020)ची ओळख आहे. क्रिकेटप्रेमी आयपीएलमधील आपले आवडते खेळाडू पाहण्यासाठी संपूर्ण वर्षभर वाट पाहत असतात. बरेच लोक टीव्हीवर स्पर्धा पाहण्याचा आनंद घेतात तर काही जण स्टेडियममध्ये जाऊन जल्लोष करत आपल्या टीमला पाठिंबा देतात. वर्षानुवर्षे आयपीएलमध्ये वाजणारी पिपाणी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. पिपाणीचा तो आवाज म्हणजे आयपीएलची ओळखच बनली.
अलीकडेच संगीतकार मयूर जुमानी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मायक्रोफोन समोर कोंबडीचं लहान पिल्लाचं रबरी खेळणं बोलतंय असं दाखवतोय. त्या चिकनचा आवाजच आयपीएलच्या टायटल साँगमध्ये वापरला असून तो लोकप्रिय होत आहे, असं त्यांच म्हणणं आहे. व्हिडिओमध्ये गाण्याची सुरुवात चिकन टॉयमधून येणाऱ्या आवाजांनी होत असल्याचे दिसत आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती टाकताना मयूरने यांनी लिहिले की "आयपीएल थीम साँगचे गुपीत म्हणजे त्यात आहे कोंबडी चा आवाज". नेटकऱ्यांना हा व्हिडिओ अधिकाधिक आवडला आहे, हे त्यांच्या 1.2 लाखाहून अधिक लाईक्स मधून सहज दिसून येत आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. व्हिडिओ वर कमेंट करताना अनेकांनी जुमानीचे अत्यंत कौतुक केलंय. जुमनी यांच्या या कलाकृतीला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि त्याचे सगळीकडूनच कौतुक होत आहे.
यावर्षी कोरोना व्हायरसमुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना आयपीएलची मजा घेता येत नाही. आयपीएलचे सगले सामने हे युएईमध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवले जात आहेत. खेळाडूंना आणि टीव्हीवर बघणाऱ्या दर्शकांसाठी यंदा प्रेक्षकांच्या आवाजाची विशेष सोय करण्यात आली आहे. आयपीएलचे यावर्षीचे सामने हे दुबई, अबु धाबी आणि शारजाह या तीन ठिकाणी खेळवण्यात येत आहेत.