बंगळुरू : आयपीएल (IPL 2020) दरम्यान झालेल्या दुखापतीवरच्या वादावर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मौन सोडलं आहे. माझ्या दुखापतीवरुन झालेला वाद गोंधळात टाकणारा आणि मनोरंजक असल्याची प्रतिक्रिया रोहित शर्मा याने दिली. मला झालेली दुखापत गंभीर नव्हती आणि मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट होईन, हे माहिती होतं, असं रोहित पीटीआयशी बोलताना म्हणाला.
आयपीएलच्या पंजाबविरुद्धच्या मॅचदरम्यान रोहितच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती, यानंतर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही. पण दुखापत झालेली असतानाही रोहित नेटमध्ये सराव करत होता, तसंच काही काळ विश्रांती घेतल्यानंतर तो पुन्हा मॅच खेळण्यासाठी उतरला. त्यामुळे रोहित आयपीएल खेळण्यासाठी फिट आहे, पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट कसा नाही? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यानंतर रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या टेस्ट टीममध्ये निवड झाली.
'नेमकं काय सुरू होतं आणि लोकं काय बोलत होते, ते मलाही माहिती नाही. पण मी बीसीसीसीआय (BCCI) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यासोबत वारंवार बोलत होतो. मी मैदानात उतरू शकतो, कारण छोट्या फॉरमॅटमध्ये मी गोष्टी व्यवस्थित हाताळू शकतो, असं मी मुंबईच्या टीमला सांगितलं. एकदा या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर, मला काय करायचं आहे, त्यावर लक्ष केंद्रीत करता येतं. आता दुखापत बरी झाली आहे. मोठा फॉरमॅट खेळण्याआधी फिटनेसबाबत स्पष्टता यायला पाहिजे, त्यासाठीच मी एनसीएमध्ये आलो आहे,' असं रोहित म्हणाला.
'मी ऑस्ट्रेलियाला जाईन का नाही, याबाबत कोण काय बोलतं त्याला मी महत्त्व देत नाही. दुखापत झाली तेव्हा पुढचे दोन दिवस मी याचा विचार केला की येत्या 10 दिवसात मी खेळू शकेन का नाही. जोपर्यंत तुम्ही मैदानात जात नाही, तोपर्यंत शरीर तुम्हाला साथ देत आहे का नाही, ते कळत नाही. पण प्रत्येक दिवशी दुखापत बरी होत होती, त्यामुळे मी खेळू शकतो, हा विश्वास वाटला आणि याबाबत प्ले-ऑफआधीच मी खेळू शकतो, असं मुंबईच्या सांगितलं. जर काही त्रास झाला असता, तर मी प्ले-ऑफ खेळलोच नसतो,' असं वक्तव्य रोहितने केलं.
'दुखापतीवर अजून काम करावं लागणार आहे, त्यामुळे मी मर्यादित ओव्हरच्या सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाला गेलो नाही. 11 दिवसात तुम्हाला 6 मॅच खेळायच्या आहेत, त्यामुळे 25 दिवस दुखापतीवर काम करण्याचं मी ठरवलं, त्यामुळे टेस्ट सीरिजमध्ये मला खेळता येईल. हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं होतं. दुसऱ्यांसाठी या गोष्टी गुंतागुंतीच्या का झाल्या, ते मला माहिती नाही,' असं रोहित म्हणाला.