IPL 2020 : '...म्हणून जडेजा-ब्राव्हो आधी केदारला बॅटिंगला पाठवलं', फ्लेमिंगचं स्पष्टीकरण

IPL 2020 : '...म्हणून जडेजा-ब्राव्हो आधी केदारला बॅटिंगला पाठवलं', फ्लेमिंगचं स्पष्टीकरण

आयपीएल (IPL 2020)च्या कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नई (CSK)चा पराभव झाला. चेन्नईच्या या पराभवानंतर केदार जाधव (Kedar Jadhav) वर टीका होत आहे. चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming)यांनी यावर उत्तर दिलं आहे.

  • Share this:

अबु धाबी, 8 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नई (CSK)चा पराभव झाला. चेन्नईच्या या पराभवानंतर केदार जाधववर टीका होत आहे. शेवटच्या काही ओव्हरमध्ये केदारने 12 बॉलमध्ये 7 रनची खेळी केली. या मॅचमध्ये केदार रवींद्र जडेजा आणि ड्वॅन ब्राव्होच्या आधी बॅटिंगला आला. जाधव मैदानात आला तेव्हा चेन्नईला विजयासाठी 39 बॉलमध्ये 21 रनची गरज होती. केदारने त्याची पहिली रन सहाव्या बॉलला काढली.

केदार जाधवला रविंद्र जडेजा आणि ड्वॅन ब्राव्होच्या आधी बॅटिंगला का पाठवलं? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming)यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. केदार जाधव सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती या कोलकात्याच्या स्पिनरवर वर्चस्व दाखवेल, असं आम्हाला वाटलं होतं. भारतासाठी केदार मधल्या आणि खालच्या फळीत खेळतो, असं फ्लेमिंग म्हणाले.

'तो काही बॉल खेळला, पण त्याला जमलं नाही. आता सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला जिंकता आलं असतं, असं वाटतंय, पण आता गोष्टी घडून गेल्या आहेत. केदार ऑफ स्पिनरला चांगला खेळतो, तसंच जडेजा सामना संपवू शकतो, पण तरी आम्ही आव्हानाचा पाठलाग करण्यात कमी पडलो,' अशी प्रतिक्रिया फ्लेमिंग यांनी दिली.

'खरंतर सेट झालेल्या बॅट्समनने सामना संपवला पाहिजे. 75 रनची पार्टनरशीप झाल्यावर, तुम्ही आणखी 5 ओव्हर खेळून मॅच संपवण्याचा विचार करता. असं झालं असतं तर निकाल वेगळा लागला असता. कोलकाता कायम मॅचमध्ये राहिली आण त्यांनी आमच्यावर दबाव बनवला. शेवटी आम्हाला वेग वाढवता आला नाही. त्यांनी सुनील नारायणच्या ओव्हर शेवटी ठेवल्या, त्यामुळे आम्हाला गोष्टी आणखी कठीण झाल्या. सामना जिंकता आला नाही, याचं आम्हाला दु:ख आहे,' असं वक्तव्य फ्लेमिंग यांनी केलं.

'टीमचं संतुलन योग्य आहे, त्यामुळे आणखी एक बॅट्समन खेळवण्याची गरज नाही. आम्हाला ब्राव्होलाही बॅटिंग देता येत नाही. 6 बॉलर असल्यामुळे टीमचा समतोल योग्य आहे. ब्राव्होलाच आठव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवावं लागत आहे त्यामुळे आणखी एक बॅट्समन घेऊन खेळल्यामुळे मदत होईल, असं आम्हाला वाटत नाही. सॅम करनही चांगलं करतोय. आमचे दोन्ही ऑल राऊंडर तसंच वॅटसन आणि फाफ चांगले खेळत आहेत, त्यामुळे परदेशी बॉलरला खेळवणं कठीण आहे. भारतीय बॉलरवर आम्ही अवलंबून आहोत,' असं फ्लेमिंग यांनी सांगितलं.

यंदाच्या मोसमात पहिलीच मॅच खेळणाऱ्या कर्ण शर्मानेही चांगली बॉलिंग केली. भविष्यात खेळपट्ट्या सुकल्यानंतर आम्ही कर्ण शर्मा, पियुष चावला आणि रवींद्ग जडेजा या तिन्ही स्पिनरना खेळवू शकतो, असे संकेत फ्लेमिंग यांनी दिले.

Published by: Shreyas
First published: October 8, 2020, 3:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या