दुबई, 22 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नईला एकामागोमाग एक धक्के लागत आहेत. मांडीच्या दुखापतीमुळे चेन्नई (CSK)चा स्टार ऑलराऊंडर ड्वॅन ब्राव्हो (Dwayne Bravo)संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे तो पुन्हा मायदेशी परतला आहे. चेन्नईच्या टीमला निरोप देण्याआधी ब्राव्होने चेन्नईच्या चाहत्यांना आवाहन केलं आहे. हे आवाहन करताना ब्राव्हो भावुक झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ब्राव्होचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. 'ही खूप वाईट बातमी आहे. चेन्नईच्या माझ्या टीमला अशाप्रकारे सोडून जाताना खूप दु:ख होत आहे. चाहत्यांनी टीमला अशाचप्रकारे पाठिंबा द्यावा,' असं ब्राव्हो म्हणाला आहे.
'अशाप्रकारच्या मोसमाची आम्ही अपेक्षा केली नव्हती आणि आमचे चाहत्यांचीही अशी इच्छा नव्हती, पण आम्ही सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न केला. तरीही निकाल आमच्या बाजूने लागले नाहीत. आम्हाला पाठिंबा द्या, आम्ही नक्की एखाद्या चॅम्पियनसारखं पुनरागमन करू,' अशी भावनिक साद ब्राव्होने घातली आहे.
आयपीएलच्या या मोसमात ब्राव्होने 6 मॅचमध्ये 8.57 च्या इकोनॉमी रेटने 6 विकेट घेतल्या. तर बॅटिंग करताना त्याला फक्त 7 रन करता आल्या.
Champion's message to the Super Fans as he bids adieu. Take care DJ! @DJBravo47 #Yellove pic.twitter.com/pHFnkHLQzq
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 21, 2020
शारजाहमध्ये दिल्लीविरुद्ध झालेल्या मॅचवेळी ब्राव्होला दुखापत झाली, त्यामुळे तो शेवटची ओव्हरही टाकू शकला नाही. त्यामुळे धोनीने शेवटची ओव्हर रविंद्र जडेजाला दिली. दिल्लीच्या अक्षर पटेलने जडेजाला तीन सिक्स मारून चेन्नईला पराभूत केलं.
चेन्नईची यंदाच्या आयपीएलमधली कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. 10 पैकी 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे प्ले-ऑफच्या शर्यतीमधून ते बाहेर झाले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे.
आयपीएलच्या सुरुवातीपासूनच चेन्नईला संकटांचा सामना करावा लागला. युएईमध्ये दाखल होताच दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंना आणि चेन्नईच्या टीममधल्या सपोर्ट स्टाफमधल्या काहींना कोरोनाची लागण झाली. तर टीमचा हुकमी एक्का सुरेश रैनाने युएईमध्ये पोहोचल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतली. हरभजन सिंगनेही आयपीएल खेळणार नसल्याचं सांगितलं. यामुळे चेन्नईची टीम आणखी कमकुवत झाली. एमएस धोनी आणि केदार जाधव यांच्या खराब फॉर्मचाही चेन्नईला फटका बसला.