अबु धाबी, 4 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात अनेक युवा खेळाडू स्वत:मध्ये असलेली प्रतिभा दाखवत आहे. या सगळ्यांच्यात बैंगलोर (Royal Challengers Bangalore)चा देवदत्त पड्डीकल (Devdutt Padikkal)सगळ्यात पुढे आहे. बैंगलोरचा हा युवा ओपनर यंदाच्या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. देवदत्त पड्डीकलने शानदार अर्धशतक करत आपल्या टीमला यंदाच्या मोसमातला तिसरा विजय मिळवून दिला आहे. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये पड्डीकलने अर्धशतकासोबतच विक्रमालाही गवसणी घातली आहे. आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला हा विक्रम करता आलेला नाही.
राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये पड्डीकलने 34 बॉलमध्ये अर्धशतक केलं. आयपीएलच्या आपल्या पहिल्याच 4 मॅचपैकी 3 मॅचमध्ये अर्धशतक करण्याचा अनोखा विक्रम पड्डीकलने केला आहे. याआधी पदार्पण करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती. पड्डीकलने हैदराबादविरुद्ध 42 बॉलमध्ये 56 रन केले. यानंतर पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये तो 1 रनवर आऊट झाला. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्येही पड्डीकलने 54 रनच केले होते. आता राजस्थानविरुद्धही त्याने अर्धशतक ठोकलं.
देवदत्त पड्डीकल मागच्या मोसमातही बैंगलोरच्या टीममध्ये होता, पण त्याला एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यावेळी पड्डीकलला बैंगलोरने खेळण्याची संधी दिली. यानंतर त्यानेही मिळालेल्या या संधीचं सोनं केलं.