दुबई, 14 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात राजस्थानची हाराकिरी सुरूच आहे. दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थान (Rajasthan Royals)चा 13 रनने पराभव झाला आहे. दिल्लीने ठेवलेल्या 162 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचे ओपनर बेन स्टोक्स आणि जॉस बटलर यांनी जलद सुरुवात करुन दिली. पण त्यांना मोठी पार्टनरशीप करता आली नाही.
बेन स्टोक्सने 35 बॉलमध्ये 41 रन केले. तर बटलर 9 बॉलमध्ये 22 रन करुन माघारी परतला. राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याचा खराब फॉर्म अजूनही कायम आहे. आजही तो 1 रन करून आऊट झाला. तर रॉबिन उथप्पाने 27 बॉलमध्ये 32 रन करुन राजस्थानला विजयाजवळ नेण्याचा प्रयत्न केला. दिल्लीकडून एनरिच नॉर्टजे आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर रबाडा, अश्विन आणि अक्सर पटेलला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
या मॅचमध्ये दिल्लीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्यांची सुरुवात खराब झाली. ओपनर पृथ्वी शॉ आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अजिंक्य रहाणेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मग शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकं करुन दिल्लीला 161 रनपर्यंत पोहोचलवलं. पण राजस्थानच्या बॉलरनी मोक्याच्या क्षणी या दोघांच्या विकेट घेतल्यामुळे दिल्लीला नंतर फटकेबाजी करता आली नाही. धवनने 57 तर अय्यरने 53 रनची खेळी केली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 3, उनाडकटने 2 आणि कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाळ याने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
राजस्थानचा यंदाच्या मोसमातला हा पाचवा पराभव आहे. 8 पैकी फक्त 3 मॅचच त्यांना जिंकता आल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम सातव्या क्रमांकावर आहे. तर दिल्लीने पुन्हा मुंबईला मागे टाकत पहिला क्रमांक गाठला आहे. दिल्लीने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.