चेन्नई, 23 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात चेन्नईची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. चेन्नईचं आयपीएलच्या प्ले-ऑफला पोहोचण्याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. यानंतर चेन्नईच्या चाहत्यांकडून धोनी आणि त्याच्या नेतृत्वार टीका करण्यात येत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू क्रिस श्रीकांत (Kris Srikkanth)यांनीही धोनीच्या रणनीतीवर टीका केली आहे. धोनीने काही दिवसांपूर्वी तरुण खेळाडूंमध्ये स्पार्क दिसत नसल्याचं वक्तव्य केलं. श्रीकांत यांनी धोनीच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
'धोनी प्रक्रियेबद्दल जे बोलत आहे, ते मी कधीच स्वीकारणार नाही. तो म्हणत असलेल्या प्रक्रियेला काहीही अर्थ नाही. तुम्ही प्रक्रियेबद्दल बोलता, पण तुमची निवड करण्याची प्रक्रियाच चुकीची आहे,' असं श्रीकांत स्टार स्पोर्ट्स तामीळशी बोलताना म्हणाले.
केदार जाधवने या मोसमात 8 मॅचमध्ये 62 रन केले, तर पियुष चावलालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. जगदीशन सारख्या तरुणांमध्ये धोनीला स्पार्क दिसत नाही, मग स्कूटर जाधवमध्ये कोणता स्पार्क आहे? असा प्रश्न श्रीकांत यांनी विचारला.
'पियुष चावला आणि केदार जाधवमध्ये धोनीला कोणता स्पार्क दिसला? कर्ण शर्माने विकेट तरी घेतल्या. धोनी महान आहे, पण मी त्याच्या मताशी सहमत नाही. पियुष चावलाला 6.75 कोटी रुपयांना आणि केदार जाधवला 7.8 कोटी रुपयांना विकत घेतलं. हे 15 कोटी रुपये पाण्यात गेले,' अशी टीका श्रीकांत यांनी केली.