अबु धाबी, 1 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफच्या रेसमधून अखेर पंजाब (KXIP)बाहेर झाली आहे. चेन्नई (CSK)विरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा तब्बल 9 विकेटने पराभव झाला आहे. पंजाबने ठेवलेल्या 154 रनच्या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने 18.5 ओव्हरमध्ये केला. ऋतुराज गायकवाडने 49 बॉलमध्ये नाबाद 62 रन केले. ऋतुराजचं हे लागोपाठ तिसरं अर्धशतक होतं. तर फाफ डुप्लेसिसने 34 बॉलमध्ये 48 रन आणि अंबाती रायुडूने 30 बॉलमध्ये नाबाद 30 रन केले. पंजाबकडून क्रिस जॉर्डनला 1 विकेट मिळाली.
या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर लुंगी एनगिडीने सुरुवातीलाच पंजाबला दोन धक्के दिले. यानंतर चेन्नईच्या बाकीच्या बॉलरनीही पंजाबला रोखून धरलं. पण सहाव्या क्रमांकावर आलेल्या दीपक हुडाने एका बाजूने किल्ला लढवला. हुडाने 30 बॉलमध्ये नाबाद 62 रन केले. चेन्नईकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर शार्दुल ठाकूर, इम्रान ताहीर आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
चेन्नईच्या टीमचं प्ले-ऑफचं आव्हान याआधीच संपुष्टात आलं होतं. तर प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम राहण्यासाठी पंजाबला हा सामना जिंकावाच लागणार होता. चेन्नईच्या टीमला यंदाच्या मोसमात सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला, पण शेवटच्या काही मॅचमध्ये त्यांना सूर गवसला, चेन्नईने या मोसमात 14 पैकी 6 मॅच जिंकल्या तर 8 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. शेवटच्या 3 मॅचमध्ये लागोपाठ विजय मिळवून चेन्नईने मोठी नामुष्की टाळली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईची टीम प्ले-ऑफमध्ये खेळणार नाही.
दुसरीकडे पंजाबची यंदाच्या वर्षातली कामगिरी रोमांचक अशीच झाली. सुरुवातीला खराब कामगिरी केल्यानंतर पंजाबने लागोपाठ 5 मॅच जिंकून प्ले-ऑफसाठी जोरदार लढत दिली, पण शेवटच्या 2 मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे त्यांनाही प्ले-ऑफ गाठणं शक्य झालं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.