दुबई, 6 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)चा जलवा अजून कायम आहे. गुरुवारी पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने दिल्ली (Delhi Capitals)चा पराभव केला. याचसोबत मुंबई आणखी एका आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे. या मॅचमध्ये बुमराहने 14 रन देऊन 4 विकेट घेतल्या, त्यामुळे या मोसमात बुमराह सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. बुमराहने या मोसमात 27 विकेट घेतल्या आहेत, त्यामुळे त्याला पर्पल कॅप देण्यात आली आहे.
बुमराहने 14 मॅचमध्ये 27 विकेट घेत दिल्लीच्या कगिसो रबाडाला मागे टाकलं आहे. रबाडाने 15 मॅचमध्ये 25 विकेट घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत मुंबईचाच ट्रेन्ट बोल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. बोल्टने 14 मॅचमध्ये 22 विकेट घेतल्या आहेत. बोल्टने गुरुवारच्या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेला शून्यवर आऊट केलं.
भुवनेश्वरचं रेकॉर्ड मोडलं
जसप्रीत बुमराह एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर ठरला आहे. याआधी हे रेकॉर्ड हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारच्या नावावर होतं. भुवनेश्वरने 2017 साली 26 विकेट घेतल्या होत्या.
आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम ड्वॅन ब्राव्होच्या नावावर आहे. ब्राव्होने 2013 साली चेन्नईकडून खेळताना 32 विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर लसिथ मलिंगा आणि जेम्स फॉकनर आहेत. या दोघांच्या नावावर 28-28 विकेट आहेत. फायनलमध्ये बुमराहने 5 विकेट घेतल्या तर तो ब्राव्होच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो.