दुबई, 20 ऑक्टोबर : वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara)ने टेस्ट, वनडे आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या टीममध्ये भारताच्या खेळाडूची निवड केली आहे. केएल राहुल हा माझ्या तिन्ही फॉरमॅटच्या टीममध्ये असेल, असं लारा म्हणाला आहे.
आयपीएल (IPL 2020)च्या लागोपाठ 3 मोसमात 500 पेक्षा जास्त रन काढणारा केएल राहुल (KL Rahul)हा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. पंजाबच्या टीमचा कर्णधार राहुल हा सध्या यंदाच्या आयपीएलमधला सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. राहुलने 9 मॅचमध्ये 75 ची सरासरी आणि 135.65 च्या स्ट्राईक रेटने 525 रन केले आहेत. यंदाच्या हंगामात राहुलने 5 अर्धशतकं झळकावली आहेत, तर बँगलोरविरुद्धच्या मॅचवेळी त्याने नाबाद 132 रनची खेळी केली होती.
राहुल माझा टेस्ट बॅट्समन, वनडे बॅट्समन आणि टी-20 बॅट्समन आहे, असं लारा स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला. 'कर्णधार म्हणूनही राहुलची कामगिरी चांगली झाली आहे. तो जशी बॅटिंग करतो ते बघणं मला आवडतं. सुरुवातीला त्याला मॅच संपवण्यासाठी संघर्ष करावा लागायचा, पण आता त्याने यामध्ये सुधारणा केली आहे,' अशी प्रतिक्रिया लाराने दिली. याआधीही लाराने केएल राहुल याच्या तंत्राचं कौतुक केलं होतं.
मुंबईविरुद्ध झालेल्या दोन सुपर ओव्हरच्या मॅचमध्ये राहुलने 51 बॉलमध्ये 77 रन केले, पण त्याला पंजाबला विजयापर्यंत घेऊन जाता आलं नाही. या खेळीमध्ये त्याने 7 फोर आणि 3 सिक्स लगावले. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबला विजय मिळाला.