IND vs WI 2nd ODI : विराटच्या शतकानंतर भुवीचा भेदक मारा, भारताचा विंडीजवर दणदणीत विजय

IND vs WI 2nd ODI : विराटच्या शतकानंतर भुवीचा भेदक मारा, भारताचा विंडीजवर दणदणीत विजय

विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने विराट कोहलीच्या शतकाच्या आणि भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीच्या जोरावर 59 धावांनी विजय मिळवला

  • Share this:

त्रिनिदाद, 12 ऑगस्ट : विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 59 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने 50 षटकांत 7 बाद 279 धावा केल्या. त्यानंतर विंडीजला पावसामुळं 46 षटकांत 270 धावांचं आव्हान देण्यात आलं. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ 210 धावांपर्यंत मजल मारू शकला.

विराट कोहलीच्या शतकानंतर गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारच्या माऱ्यासमोर विंडीजच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. भुवनेश्वर कुमारनं 31 धावांत 4 बळी घेतले. विंडीजची आघाडीची फळी पुन्हा एकदा फेल ठरली. स्फोटक फलंदाज ख्रिस गेल फक्त 11 धावांवर बाद झाला. तर शाय होपला 5 धावाच करता आल्या. शेम्रॉन हेटमायर 18 धावा करून तंबूत परतला.

एविन लुईस आणि निकोलस पूरन यांनी डाव सावरला पण लुईसला बाद करून कुलदीप यादवनं ही जोडी फोडली. त्यानंतर निकोलस पूरन आणि रॉस्टन चेज यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. या दोघांना एकाच षटकांत भुवनेश्वर कुमारनं लागोपाठ बाद केलं. त्यानंतर कार्लोस ब्रेथवेट आणि केमार रोच यांना खातंही उघडता आलं नाही. शेवटी शेल्डन कॉट्रेलनं वेगवान 17 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. शिखर धवन पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानं फक्त दोन धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भागिदारी केली. यात रोहित शर्माचा वाटा फक्त 18 धावांचा होता. रोहित बाद झाल्यानंतर अखेरच्या टी20 सामन्यात अर्धशतक करणाऱा ऋषभ पंत 20 धावा करून बाद झाला. त्यावेळी संघाची अवस्था 3 बाद 101 अशी झाली होती.

विराट कोहलीला श्रेयस अय्यरनं अर्धशतकी खेळी करत साथ दिली. दोघांनी 125 धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या 200 च्या वर नेली. कोहलीने 125 चेंडूत 14 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्यानं 120 धावा केल्या. श्रेयस अय्यरनं 71 धावांची खेळी केली. विराट बाद झाल्यानंतर पावसामुळं खेळ थांबला. पुन्हा खेळ सुरू होताच श्रेयस अय्यर बाद झाला. त्याच्यानंतर केदार जाधव आणि रविंद्र जडेजा यांनी फटकेबजी करण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही प्रत्येकी 16 धावा केल्या.

Special Report : कडक सॅल्युट! पुरात अडकलेल्यांसाठी देवदूत ठरलेल्या वर्दीतल्या 'बाप' माणसांचा VIDEO पाहून ऊर येईल भरून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 07:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading