मुंबई, 9 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील नॉटिंघममध्ये (IND vs ENG Nottingham Test) झालेली पहिली टेस्ट ड्रॉ झाली आहे. या टेस्टच्या पाचव्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेला. वास्तविक ही टेस्ट जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्याची टीम इंडियाला संधी होती. पण पावसानं ती संधी हिरावली. नॉटिंघम टेस्ट ड्रॉ झाल्याची किंमत टीम इंडियाला भविष्यात मोजावी लागू शकते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) नव्या नियमांनुसार मॅच ड्रॉ झाल्यानं दोन्ही टीमना प्रत्येकी 4 पॉईंट्स मिळणार आहेत. याचा सरळ फटका भारतीय क्रिकेट टीमला बसला आहे. कारण, मॅच जिंकून त्यांना संपूर्ण 12 पॉईंट्स घेण्याची संधी होती.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या टेस्ट सीरिजपासूनच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सिझनला सुरुवात झाली आहे. यंदा नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक टेस्टचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. मागील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत टीम इंडियानं सर्वाधिक पॉईंट्स कमावले होते. त्यानंतर फायनलमध्ये न्यूझीलंडनं भारतीय टीमचा पराभव केला. या पराभवाची भरपाई करत विजेतेपद जिंकण्याच्या उद्देशानं टीम इंडिया मैदानात उतरली आहे. पहिल्या टेस्टमध्ये चांगला खेळ करुनही त्यांना पावसामुळे 8 पॉईंट्सचे नुकसान सहन करावे लागले आहे. हे नुकसान भविष्यात फायनल गाठण्याचा अडथळा ठरु शकते.
काय आहेत नवे नियम?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत यंदा एक टेस्ट जिंकल्यानंतर 12 पॉईंट्स, ड्रॉ झाली तर दोन्ही टीमना 4-4 पॉईंट्स आणि टाय झाली तर दोन्ही टीमना प्रत्येकी 6-6 पॉईंट्स मिळणार आहेत. यापूर्वीच्या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सीरिजच्या आधारावर पॉईंट्स मिळत होते. एका सीरिजमध्ये जास्तीत जास्त 120 पॉईंट्स दिले जात. पाच टेस्टची सीरिज खेळणाऱ्या टीमला याचा मोठा फटका बसला होता. तर दोन टीम खेळणाऱ्या टीमना मोठा फायदा झाला.
Tokyo Olympic : नीरज गोल्ड मेडल जिंकला म्हणून 501 रुपयांचं पेट्रोल फ्री, अट फक्त एकच!
टीम इंडिया यंदा न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत मायदेशी टेस्ट सीरिज खेळेल. तर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलदेश देशांसोबत त्यांच्या देशात टेस्ट सीरिज खेळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england