लॉर्ड्स, 12 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट (India Vs England, 2nd Test) लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे. या टेस्टमध्ये भारतीय बॅट्समन आणि इंग्लंडचे बॉलर्स यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. त्याचवेळी या टेस्टच्या दरम्यान टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्रींच्या (Ravi Shastri) भवितव्याचा निर्णय होणार आहे.
एका रिपोर्टनुसार टी20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री तसंच त्यांचे सहकारी भरत अरूण, आर.श्रीधर आणि विक्रम राठोड हे पदभार सोडणार आहेत. शास्त्री आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफचा निर्णय लॉर्ड्स टेस्टच्या दरम्यानच होणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) हे लॉर्ड्सवर दाखल झाले आहेत. या टेस्टच्या दरम्यान हे दोघं शास्त्रींशी त्यांच्या भवितव्यावर चर्चा करणार आहेत.
'इनसाईड स्पोर्ट्स'च्या रिपोर्टनुसार या विषयावर काही बोलणे घाईचे ठरेल अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष, सचिव आणि अन्य अधिकारी लंडनमध्ये दाखल झाले आहेत. ते आता शास्त्रींशी सविस्तर चर्चा करतील. शास्त्रींचा करार नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. त्यानंतर नव्या कोचिंग स्टाफची नियुक्ती करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.
रवी शास्त्रीचा वारसदार म्हणून राहुल द्रविडचं (Rahul Dravid) नाव चर्चेत आहे. भारतीय टीमच्या श्रीलंकेच्या दौऱ्यात त्यानं हेड कोचची जबाबदारी सांभाळली होती. मात्र ही सीरिज संपल्यानंतर आपण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) संचालक म्हणून खूश असल्याचं द्रविडनं सांगितलं होतं.
IND vs ENG : टीम इंडियानं केली होती तक्रार, अंपायरमुळे हुकलं रोहितचं ऐतिहासिक शतक
रवी शास्त्रीची कारकिर्द
रवी शास्त्रींच्या कोचिंग कारकिर्दीमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियामध्ये दोनदा टेस्ट सीरिज जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेत वन-डे आणि टी 20 मालिका जिंकली. त्याचबरोबर टीम इंडियानं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र टीम इंडियाला आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद जिंकण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे टी20 वर्ल्ड कप जिंकून टीम शास्त्रीला गोड निरोप देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Ravi shastri