सिडनी, 28 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये भारताचा (India vs Australia) 66 रनने मोठा पराभव झाला. टीमचं संतूलन नीट नसल्यामुळे हा पराभव झाल्याची टीका अनेकांनी केली. पहिल्या वनडेमध्ये भारती टीम फक्त 5 बॉलर घेऊन मैदानात उतरली होती. हार्दिक पांड्या बॉलिंग करण्यासाठी फिट नसल्यामुळे तो बॅट्समन म्हणून खेळत होता, त्यामुळे भारतीय टीमचं संतूलन बिघडलं आणि ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 374 रन केले. टीम इंडियाला सीरिजमध्ये पुनरागमन करायचं असेल तर त्यांना टीममध्ये बदल करावे लागणार आहेत. रविवारी या दोन्ही टीममध्ये दुसरी वनडे होणार आहे.
टीम इंडियाला दुसऱ्या वनडेमध्ये 6 बॉलर घेऊन मैदानात उतरावं लागेल. पण हा पर्याय बॅटिंग करणाराही असला पाहिजे. सध्या तरी टीममध्ये शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हा एकमेव खेळाडू हे काम करू शकतो. शार्दुलला संधी मिळाली तर तो 10 ओव्हर टाकण्यासोबतच शेवटच्या काही ओव्हरमध्ये बॅटिंगही करू शकतो.
शार्दुल ठाकूर बॉल दोन्ही बाजूंनी स्विंग करतो, त्यामुळे त्याला नवा बॉलही देता येईल. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचला स्विंग होणाऱ्या बॉलचा सामना करताना त्रास होतो, त्यामुळे ठाकूर याचा फायदा घेऊ शकतो. सोबतच शार्दुलची बॅटिंगही भारताला मदत करू शकते. मागच्यावर्षी कटकमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेमध्ये शार्दुलने आपण चांगली बॅटिंग करू शकतो हे दाखवून दिलं होतं.
शार्दुल ठाकूरला संधी द्यायची असेल तर मयंक अग्रवाल किंवा श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाला बाहेर बसवलं जाऊ शकतं. मयंकला बाहेर ठेवलं तर शिखर धवन आणि केएल राहुल ओपनिंगला खेळू शकतात. तर हार्दिक पाचव्या, जडेजा सहाव्या आणि शार्दूल सातव्या क्रमांकावर बॅटिंग करेल. याशिवाय श्रेयस अय्यरला बाहेर ठेवलं तर त्याच्याऐवजी राहुल चौथ्या क्रमांकावर खेळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.