मुंबई, 26 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी वनडे आधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) बाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. मॅचआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित ऑस्ट्रेलियाला का आला नाही? याबाबत मला माहिती नसल्याचं विराट म्हणाला. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आमच्याच विमानात असेल, असं आम्हाला वाटल्याचंही विराटने सांगितलं.
आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर रोहित शर्मा मुंबईला परतला होता. तर टीम इंडियाचे खेळाडू युएईवरुनच ऑस्ट्रेलियाला रवाना झाले होते. रोहित शर्मा फिट नसल्यामुळे तो वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार नाही, असं बीसीसीआयने सांगितलं. पण आता विराट कोहलीने केलेल्या वक्तव्यामुळे गोंधळ वाढवला आहे.
'मोठी दुखापत होऊ शकते, त्यामुळे तुझी वनडे आणि टी-20 सीरिजसाठी निवड होणार नसल्याचं निवड समितीच्या बैठकीआधी रोहितला सांगण्यात आलं. पण यानंतर रोहित आयपीएलमध्ये खेळला, त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आमच्यासोबतच येईल, असं मला वाटलं होतं, पण असं झालं नाही. रोहित शर्माबाबत आम्हाला कोणतीही माहिती दिली गेली नाही', असं वक्तव्य विराट कोहलीने ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्समध्ये केलं.
'निवड समितीच्या बैठकीआधी रोहित उपलब्ध नसेल, असा ई-मेल आम्हाला मिळाला. रोहितला आयपीएल खेळताना दुखापत झाली. रोहितला त्याच्या दुखापतीविषयी माहिती देण्यात आली आणि त्याला खेळता येणार नाही हेदेखील रोहितला सांगण्यात आल्याचं मेलमध्ये स्पष्ट करण्यात आलं,' असं विराटने सांगितलं.
'यानंतर रोहित आयपीएलमध्ये खेळला, त्यामुळे तो आमच्यासोबतच ऑस्ट्रेलियात येईल, असं सगळ्यांना वाटलं. तो आमच्यासोबत ऑस्ट्रेलियात का येत नाही, याबाबत आम्हाला कोणतीही सूचना देण्यात आली नाही. स्पष्टतेची कमी होती. आम्ही वाट पाहत आहोत,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.