सिडनी, 7 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा 6 विकेटने विजय झाला. याचसोबत भारताने ही टी-20 सीरिज 2-0ने जिंकली आहे. वनडेमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियावर जोरदार टीका झाली होती. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तर काहींनी टीम रोहित शर्मा (Rohit Sharma) वर अवलंबून असल्याचं म्हणलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातल्या वादाच्या चर्चाही सुरू झाल्या. पण या वादानंतर टीम इंडिया फॉर्ममध्ये आली आणि वनडे सीरिजच्या पराभवाचा बदला टी-20 सीरिजमध्ये घेतला. या विजयानंतर विराटने रोहित शर्माची आठवण काढली.
दुसऱ्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाने 5 विकेट गमावून 194 रन केले, यानंतर भारताने हे आव्हान 19.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. शिखर धवनने 52 रन, हार्दिक पांड्याने 42 रन आणि कोहलीने 40 रनची खेळी केली.
सीरिज जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला, 'हा विजय शानदार आहे. आम्ही टी-20 मॅचमध्ये टीम म्हणून चांगली कामगिरी केली आहे. या मॅचमध्ये आम्ही रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहशिवाय विजय मिळवला, त्यामुळे हा विजय आणखी महत्त्वाचा आहे.'
Amazing game of cricket. Well done boys pic.twitter.com/IUqiiXNTkj
— Virat Kohli (@imVkohli) December 6, 2020
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी टी-20 मंगळवारी सिडनीमध्ये होणार आहे. ही मॅच जिंकून ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करण्याची संधी भारताला आहे. दुसऱ्या टी-20 मध्ये विजय मिळवत भारताने लागोपाठ 10 टी-20 मॅच जिंकण्याचा विक्रम केला. टी-20 मध्ये लागोपाठ विजय मिळवण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. अफगाणिस्तानने सलग 11 वेळा आणि सलग 12 वेळा टी-20 मॅच जिंकल्या आहेत. तिसरी टी-20 मॅच जिंकून अफगाणिस्तानच्या 11 मॅच जिंकण्याच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी भारताला आहे.