कॅनबेरा, 2 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 12 हजार रन करण्याचा विक्रम विराटने केला आहे. याआधी हे रेकॉर्ड सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) च्या नावावर होतं. तिसऱ्या वनडेमध्ये विराटला 12 हजार रन पूर्ण करायला 23 रनची गरज होती, त्यामुळे या रन पूर्ण करताच विराटने इतिहास घडवला.
251 वी वनडे आणि 242 व्या इनिंगमध्ये विराटने हा विक्रम केला आहे. तर सचिनला 12 हजार रन पूर्ण करायला 309 वनडे आणि 300 इनिंग लागल्या होत्या. सचिनच्या 58 मॅचआधीच विराट कोहलीने 12 हजार रन पूर्ण केले आहेत.
या यादीमध्ये विराट आणि सचिननंतर रिकी पॉण्टिंगचा नंबर आहे. पॉण्टिंगने 323 मॅचच्या 314 इनिंगमध्ये, कुमार संगकाराने 359 मॅचच्या 336 इनिंगमध्ये, सनथ जयसूर्याने 390 मॅचच्या 379 इनिंगमध्ये आणि महेला जयवर्धनेने 426 मॅचच्या 399 इनिंगमध्ये 12 हजार रन पूर्ण केले.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटच्या नावावर वनडेमध्ये 43 शतकं आहेत, तर या यादीतही सचिन तेंडुलकरच पुढे आहे. सचिनच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 49 शतकं आहेत.