कॅनबेरा, 2 डिसेंबर : यश त्यांनाच मिळतं जे स्वत:चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करतात आणि हा संघर्ष करताना अजिबात निराश होत नाहीत. भारताचा फास्ट बॉलर टी. नटराजन हे याचंच एक उदाहरण म्हणावं लागेल. गरिब घरात जन्माला आलेल्या टी नटराजन (T Natrajan) याला त्याच्या आईने मोल मजुरी करून मोठं केलं. हा संघर्षमय प्रवास केल्यानंतर आता टी नटराजन याला टीम इंडियाची जर्सी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये नटराजन याला भारतीय टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. तामीळनाडूचा हा डावखुरा फास्ट बॉलर त्याच्या यॉर्करने ऑस्ट्रेलियन बॅट्समनची भंभेरी उडवण्यासाठी सज्ज झाला आहे.
आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात नटराजन याने त्याच्या यॉर्करने दिग्गज बॅट्समनची भंबेरी उडवली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. नटराजन याला टीम इंडियाची जर्सी मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर हा फोटो शेयर केला. नटराजन याचा हा फोटो देशासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न बघणाऱ्या कोट्यवधी तरुणांसाठी आशेचा किरण आहे. ही जर्सी घालून एकदम खास वाटतं, स्वप्नांवर विश्वास ठेवा, असं ट्विट नटराजन याने केलं आहे.
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी
नटराजन याने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करत 16 मॅचमध्ये 16 विकेट घेतल्या. नटराजनने आयपीएलमध्ये 8.02 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. शेवटच्या ओव्हरमध्ये भेदक यॉर्कर टाकून नटराजनने धोनीसारख्या दिग्गजांच्या विकेट घेतल्या. याच कामगिरीमुळे नटराजनसाठी टीम इंडियाची दारं खुली झाली.
मोल मजुरी करायची आई
नटराजनने आयपीएलमध्ये नाव कमावून टीम इंडियामध्ये प्रवेश केला असला तरी त्याचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये नटराजन लहानाचा मोठा झाला. त्याचा जन्म तामीळनाडूच्या चिन्नापाम्पट्टी गावात झाला होता. नटराजनची आई मोल मजुरी करत होती. नटराजन हा सुरुवातीला टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचा. त्यावेळी त्याचे बॉलिंग प्रशिक्षक जयप्रकाश यांनी नटराजनची प्रतिभा ओळखली आणि त्याला तामीळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी दिली. इकडेच नटराजनचं नशीब बदललं.
तामीळनाडूकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नटराजन याने 9 मॅचमध्ये 27 विकेट घेतल्या आहेत. 2017 साली नटराजनला पंजाब (KXIP) ने तीन कोटी रुपयांना विकत घेतलं, पण पुढच्या मोसमासाठी त्याला टीममध्ये ठेवलं नाही. अखेर हैदराबादने 40 लाख रुपयांमध्ये नटराजनला टीममध्ये घेतलं. हैदराबादला या मोसमात प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्यात नटराजनने मोलाची भूमिका बजावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.