सिडनी, 28 नोव्हेंबर : भारताच्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्याची सुरुवात अत्यंत खराब झाली. सिडनीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला. फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये भारतीय टीम अपयशी राहिली. तसंच टीममध्ये ऑलराऊंडर नसल्याची कमीही जाणवली. भारताच्या या कामगिरीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Micheal Vaughan) नाराज झाला, तसंच संपूर्ण दौऱ्यात भारताच्या कामगिरीबाबतही वॉनने भाष्य केलं आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात तिन्ही सीरिज गमावेल, अशी भविष्यवाणी मायकल वॉनने केली आहे. याबाबतचं एक ट्विट वॉनने केलं आहे. मायकल वॉनने टीम इंडियाची पाच बॉलर घेऊन खेळण्याची जुनी रणनीती योग्य नसल्याचं म्हणलं आहे. 'भारतीय वनडे टीमची रणनीती मला जुनी वाटते. फक्त पाच बॉलर घेऊन खेळणं आणि बॅटिंगही तळापर्यंत नाही,' असं वॉन म्हणाला.
भारतीय बॉलरनी 50 ओव्हर पूर्ण करायला चार तासांपेक्षा जास्तचा वेळ लावला, याबाबतही वॉनने नाराजी जाहीर केली. 'भारताचा ओव्हर रेट खराब होता. शारिरिक भाषाही रक्षात्मक होती. फिल्डिंग खराब आणि बॉलिंग सामान्य होती. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली,' असं वॉन म्हणाला.
वनडे सीरिजसाठी भारताने फक्त एक ऑलराऊंडरची निवड केली आहे. हार्दिक पांड्या बॉलिंग करण्यासाठी फिट नाही, ऑलराऊंडर म्हणून फक्त रविंद्र जडेजाचा पर्याय आहे, त्यामुळे विराटला फक्त 5 बॉलर घेऊन मैदानात उतरावं लागत आहे. तसंच टीमचे सुरुवातीच्या 6 बॅट्समनपैकी कोणीही बॉलिंग करत नाही, त्यामुळे विराटसमोर आणखी अडचण आहे.
सिडनीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेत पाचवा बॉलर विराटसाठी महाग ठरला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 374 रन केले. पराभवानंतर विराटने ऑलराऊंडर नसल्याचं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.