Home /News /sport /

IND vs AUS : पहिल्याच टी-20 मध्ये नटराजन चमकला, भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

IND vs AUS : पहिल्याच टी-20 मध्ये नटराजन चमकला, भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

आपली पहिलीच टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या टी. नटराजन (T. Natrajan) याने चमकदार कामगिरी करत भारताला (India vs Australia) विजय मिळवून दिला आहे

    कॅनबेरा, 4 डिसेंबर : आपली पहिलीच टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या टी. नटराजन (T. Natrajan) याने चमकदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला आहे. भारताने ठेवलेल्या 162 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 150/7 पर्यंतच मजल मारता आली, त्यामुळे भारताचा 11 रनने विजय झाला. टी नटराजनने 4 ओव्हरमध्ये 30 रन देऊन 3 विकेट घेतल्या. तर मॅचमध्ये खेळत नसलेल्या युझवेंद्र चहल ने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 3 विकेट घेतल्या. बॅटिंग करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाच्या हेल्मेटला बॉल लागला, त्यामुळे नव्या कनकशन सबस्टिट्युटच्या नियमानुसार चहल जडेजाऐवजी फिल्डिंगला आला आणि त्याने बॉलिंगही केली. याशिवाय दीपक चहरने 4 ओव्हरमध्ये 29 देऊन 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून ऍरोन फिंच याने सर्वाधिक 35 रन केले, तर डाआर्सी शॉर्टला 34 आणि मोईसेस हेनरिक्सला 30 रन करता आले. या विजयासोबतच भारताने तीन टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये भारताची बॅटिंग गडगडली आहे. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताला 20 ओव्हरमध्ये 161/7 स्कोअरवर रोखलं. केएल राहुलने 40 बॉलमध्ये सर्वाधिक 51 रनची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने पुन्हा एकदा सातव्या क्रमांकावर येऊन फटकेबाजी केली. जडेजा 23 बॉलमध्ये 44 रनवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मोईसेस हेनरिक्सला 3, मिचेल स्टार्कला 2 आणि एडम झम्पा, मिचेल स्वेपसनला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज गमावल्यानंतर टी-20 सीरिजमध्ये बदला घेण्यासाठी भारतीय टीम (India vs Australia) मैदानात उतरली आहे. पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारताकडून या मॅचमध्ये डावखुरा फास्ट बॉलर टी.नटराजन टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याआधी तिसऱ्या वनडेमधून नटराजन पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. तर जसप्रीत बुमराहला पहिल्या टी-20 साठी विश्रांती देण्यात आली. वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन आणि दीपक चहर हेदेखील टीममध्ये आहेत. तर श्रेयस अय्यरऐवजी मनिष पांडेलाही संधी मिळाली. पुढच्यावर्षी भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही सीरिज महत्त्वाची आहे. टी-20 वर्ल्ड कपआधी भारताला फार मॅच खेळण्याची संधी मिळणार नाही, त्यामुळे विराटला वर्ल्ड कपसाठी टीम तयार करण्याचं आव्हान आहे. याआधी वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडमध्ये झालेल्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा 5-0ने विजय झाला होता. त्या सीरिजच्या दोन मॅच सुपर ओव्हरमध्ये गेल्या होत्या आणि दोन्ही मॅचमध्ये रोहित शर्माने भारताला विजय मिळवून दिला होता. यावेळी मात्र रोहित शर्माशिवाय टीम मैदानात उतरली होती. भारतीय टीम शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, मनिष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, मोहम्मद शमी, टी नटराजन ऑस्ट्रेलियाची टीम डीआरसी शॉर्ट, एरॉन फिंच, मॅथ्यू वेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॉईसेस हेनरिक्स, मिच स्वेपसन, सीन एबॉट, मिचेल स्टार्क, एडम झम्पा, जॉस हेजलवूड
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या