सिडनी, 8 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये (India vs Australia) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि टी नटराजन (T.Natrajan) चमकले. पांड्याने बॅटने तर नटराजनने बॉलने उल्लेखनीय कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारताने टी-20 सीरिज 2-1 ने जिंकली. दुसऱ्या टी-20 मध्ये पांड्याने नाबाद 42 रनची खेळी करून भारताला जिंकवून दिलं. तर दुसरीकडे आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्याच दौऱ्यावर नटराजनने पहिल्या मॅचमध्ये तीन विकेट, दुसऱ्या मॅचमध्ये दोन विकेट आणि तिसऱ्या मॅचमध्ये एक विकेट घेतली.
तिसऱ्या मॅचमध्ये भारताचा 12 रनने पराभव झाला असला तरी भारताने आधीच ही सीरिज खिशात टाकली होती. हार्दिक पांड्या याला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं, पण त्याने मोठे मन दाखवलं आणि आपला मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार नटराजनला दिला.
Gestures like giving his Man of the Series award to an equally deserving Natarajan show just how much Hardik Pandya has matured over the last couple of years.
टी. नटराजन याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून प्रत्येक मॅचमध्ये त्याने प्रभावित केलं आहे. दुसऱ्या टी-20 मध्येही हार्दिक पांड्याला मॅन ऑफ द मॅच मिळालं होते, तेव्हा त्याने नटराजनला मॅन ऑफ द मॅच मिळायला पाहिजे होतं, कारण त्याने 10-15 रन कमी दिल्या आणि आम्ही जिंकलो, अशी प्रतिक्रिया दिली होती. दुसऱ्या टी-20 मध्ये नटराजनने 4 ओव्हरमध्ये 5 च्या इकोनॉमी रेटने 20 रन दिले आणि 2 विकेट घेतल्या.
मॅन ऑफ द सीरिज मिळाल्यानंतर पांड्या म्हणाला, 'मी खूप खूश आहे. हा कोणा एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण टीमचा प्रयत्न होता. दुसरी वनडे हरल्यानंतर आम्ही चार टेस्ट मॅचच्या सीरिजबाबत विचार करायला सुरुवात केली आणि लागोपाठ तीन विजय मिळवले. या विजयानंतर आनंदी आहे.'