मुंबई, 12 डिसेंबर : नॅशनल क्रिकेट ऍकेडमी (NCA) ने रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या फिटनेसला हिरवा कंदील दाखवला आहे. आता रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी कधी रवाना होणार आणि तो ट्रेनिंगला कधी सुरुवात करणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन दिवसांमध्ये रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. बीसीसीआय (BCCI) ने मात्र याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण रोहित ऑस्ट्रेलियात शेवटच्या दोन टेस्ट मॅच खेळेल, हे जवळपास निश्चित आहे.
मेलबर्न का सिडनी?
रोहित शर्माला मेलबर्नला पाठवायचं का सिडनीला हा मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे. कोरोना व्हायरसमुळे रोहितच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा प्लान फसला आहे. कोरोना प्रोटोकॉलनुसार ऑस्ट्रेलियात पोहोचताच रोहितला 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. पुढच्या दोन दिवसात रोहित ऑस्ट्रेलियात पोहोचला, तर त्याचा क्वारंटाईन कालावधी 28 डिसेंबरला संपेल. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टेस्ट 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरू होईल.
मेलबर्नमध्ये 26 ते 30 डिसेंबरदरम्यान दुसरी टेस्ट मॅच होणार आहे. बीसीसीआयचे अधिकारी रोहितने मेलबर्नला जावं, ज्यामुळे तो टीमच्या इतर सदस्यांसोबत लवकर जोडला जाईल, या मताचे आहेत. इंग्रजी वृत्तपत्र मिड डेसोबत बोलताना बीसीसीआयचे ट्रेजरर अरुण धुमल म्हणाले, 'रोहितला मेलबर्नला पाठवायचं, का सिडनीला याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही. रोहित ऑस्ट्रेलियात पोहोचताच टीमच्या सपोर्ट स्टाफच्या संपर्कात राहिल. क्वारंटाईन कालावधीमध्ये तो ट्रेनिंग करेल. मेलबर्नमध्ये तो पोहोचला तर बरं होईल, पण सपोर्ट स्टाफ याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतं.'