बंगळुरू, 11 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली टेस्ट सीरिज सुरू व्हायला आता एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. दोन्ही टीममध्ये 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये पहिली टेस्ट खेळवली जाणार आहे. पण रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाला जाणार का नाही? याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला गेला नव्हता. बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट ऍकेडमी (NCA)मध्ये रोहितची फिटनेस टेस्ट होईल, यानंतर एनसीए बीसीसीआयला रोहितचा फिटनेस रिपोर्ट देईल. फिटनेस टेस्टमध्ये रोहित पास झाला तर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना होईल.
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार आज कधीही रोहितची फिटनेस टेस्ट घेतली जाऊ शकते. रोहित फिटनेस टेस्ट पास झाला तरी, त्याला ऑस्ट्रेलियाला कसं पाठवायचं? हे आव्हान बीसीसीआयपुढे असणार आहे. कोरोना व्हायरसमुळे टीम इंडियाचे खेळाडू बायो-बबलमध्ये आहेत, म्हणजेच टीमचे खेळाडू वेगळे राहतात, त्यांना टीमपासून बाहेर जाण्याची परवानगी नाही.
तिसरी टेस्ट खेळणार रोहित?
रोहित शर्मा जरी ऑस्ट्रेलियात पोहोचला तरी तो किती टेस्ट मॅच खेळणार, याबाबतही प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियातल्या सरकारी नियमांनुसार तिकडे पोहोचल्यावर प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागतं. रोहित जर 12 किंवा 13 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाला पोहोचला, तरी त्याला 26 डिसेंबरपर्यंत क्वारंटाईन व्हावं लागेल, त्यामुळे तो बॉक्सिंग डे टेस्ट खेळू शकणार नाही. त्यामुळे तो सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून होणाऱ्या तिसऱ्या टेस्टपासूनच उपलब्ध होऊ शकतो.
रोहितच्या दुखापतीचा वाद
मागच्या महिन्यात आयपीएलदरम्यान रोहित शर्माला झालेल्या दुखापतीवरुन वाद झाला होता. मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही, पण काही मॅच विश्रांती घेतल्यानंतर रोहित आयपीएल खेळण्यासाठी पुन्हा मैदानात उतरला. आयपीएलसाठी फिट असणारा रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट कसा नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यानंतर रोहित एनसीएमध्ये दुखापतीवर उपचार घेण्यासाठी आणि फिट होण्यासाठी गेला. विराटनेही रोहितच्या दुखापतीबाबत आम्हाला अंधारात ठेवण्यात आल्याचं सांगितलं. रोहित ऑस्ट्रेलियाला का आला नाही, याबाबत मला माहिती नाही, अशी धक्कादायक प्रतिक्रिया विराटने दिली. यानंतर बीसीसीआयला रोहितच्या दुखापतीबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.