बँगलोर, 19 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया (Team India) सिडनीमध्ये सराव करत आहे, तर दुसरीकडे टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) बँगलोरमध्ये घाम गाळत आहे. रोहित शर्मा बँगलोरच्या नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये राहुल द्रविड (Rahul Dravid) च्या निरिक्षणाखाली सराव करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजसाठी टीममध्ये सामील होण्यासाठी रोहितने एनसीएमध्ये फिटनेस ट्रेनिंगला सुरुवात केली आहे.
आयपीएल (IPL 2020) दरम्यान दुखापत झाल्यामुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नव्हती. पण आयपीएलच्या शेवटच्या काही मॅच खेळण्यासाठी रोहित मैदानात उतरला, यानंतर निवड समितीने रोहितची टेस्ट सीरिजसाठी निवड केली.
एकीकडे बीसीसीआयने रोहित शर्मा फिट नसल्याचं सांगितलं असलं, तरी रोहितने मात्र आपण फिट असल्याचं म्हणलं होतं. रोहितच्या मांडीच्या स्नायूला आयपीएल खेळताना दुखापत झाली होती. रोहितला दुखापतीतून सावरायला वेळ लागेल, असं बीसीसीआयने सांगितलं, पण तरीही रोहित मैदानात उतरला, त्यामुळे वाद निर्माण झाला होता. आयपीएलच्या फायनलमध्ये रोहितने 68 रनची खेळी करून मुंबई (Mumbai Indians) ला जिंकवून दिलं.
टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्माचं फिट होणं गरजेचं झालं आहे, कारण टीम इंडियाचा कर्णधार ऑस्ट्रेलियातली पहिली टेस्ट झाल्यानंतर भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून येणार आहे.
रोहित शर्मासोबतच इशांत शर्माही एनसीएमध्ये ट्रेनिंग करत आहे. बुधवारी निवड समिती अध्यक्ष सुनिल जोशी आणि एनसीए प्रमुख राहुल द्रविड यांच्या देखरेखीखाली इशांतने बॉलिंग केली. दुखापतीनंतर इशांत शर्मा एनसीएमध्ये ट्रेनिंगसाठी आला आहे. इशांत आणि रोहित शर्मा एकाचवेळी ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. टीमसोबत येण्याआधी या दोघांना ऑस्ट्रेलियामध्ये 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.