IND vs AUS : विराट नसताना रहाणेला कर्णधार केलं तर... पॉण्टिंगने दिला धोक्याचा इशारा

IND vs AUS : विराट नसताना रहाणेला कर्णधार केलं तर... पॉण्टिंगने दिला धोक्याचा इशारा

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार आहे, त्यामुळे विराट (Virat Kohli) च्या अनुपस्थितीमध्ये त्याच्याकडेच टीमचं नेतृत्व असेल. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने मात्र यावरुन टीम इंडियाला धोक्याचा इशारा दिला आहे.

  • Share this:

सिडनी, 19 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया (Team India) सिडनीमध्ये पोहोचली आहे. 27 नोव्हेंबरला वनडे सीरिजपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यात पहिली टेस्ट मॅच संपल्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परत येणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडणार आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार आहे, त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्याकडेच टीमचं नेतृत्व असेल. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने मात्र यावरुन टीम इंडियाला धोक्याचा इशारा दिला आहे.

कोहलीच्या गैरहजेरीत भारतीय टीमवर दबाव असेल, कारण त्यांना कोहलीचं नेतृत्व आणि त्याची बॅटिंग याचा दबाव जाणवेल, असं पॉण्टिंग क्रिकेट.कॉम.एयू सोबत बोलताना म्हणाला.

'अजिंक्य रहाणे भारतीय टीमचं नेतृत्व करेल, पण यामुळे त्याच्यावर अधिकचा दबाव पडेल. तसंच त्याला चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करणारा खेळाडू शोधावा लागेल. पहिल्या टेस्टमध्ये त्यांचा बॅटिंग क्रम काय असणार? इनिंगची सुरुवात कोण करणार? कोहली गेल्यानंतर चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? याबाबत भारतीय टीममध्ये अजूनही स्पष्टता नाही,' अशी प्रतिक्रिया पॉण्टिंगने दिली.

अंतिम-11 खेळाडू निवडताना अडचण

भारताचं बॉलिंग आक्रमण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्याकडे असेल. इशांत शर्मा जर फिट झाला, तर त्याला संधी मिळेल. उमेश यादव, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराजदेखील भारतीय टीममध्ये आहेत. भारताकडे एवढे पर्याय असल्यामुळे ऑस्ट्रेलियापेक्षा त्यांनाच जास्त अडचणी येतील, असं मत पॉण्टिंगने मांडलं आहे.

'शमी, जसप्रीत बुमराह टीममध्ये आहेत. इशांत फिट होईल का? उमेश यादवला घ्यायचं का सैनी, सिराज यांच्यासारख्या युवा खेळाडूंना संधी द्यायची? ऍडलेडमध्ये गुलाबी बॉलने मॅच होणार असल्यामुळे स्पिनर म्हणून कोणाची निवड करायची? असे बरेच प्रश्न भारतीय टीमपुढे असतील,' असं पॉण्टिंग म्हणाला.

स्मिथ-वॉर्नर नसल्यामुळे विजय

भारताने 2018-19 साली ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच सीरिज जिंकून इतिहास घडवला होता. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या गैरहजेरीत भारताने सीरिज जिंकली होती. 2018 साली बॉलशी छेडछाड केल्याप्रकणी वॉर्नर आणि स्मिथ यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. स्मिथ आणि वॉर्नर नसल्यामुळे मागच्यावेळी दोन्ही टीममध्ये बरच अंतर होतं, असं वक्तव्य पॉण्टिंगने केलं.

पॉण्टिंगने ऑस्ट्रेलियाकडून ओपनिंगला युवा पुकोवस्कीऐवजी जो बर्न्सने खेळावं, याचं समर्थन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅन्गर आणि कर्णधार टीम पेन यानेही बर्न्सलाच संधी देण्याचे संकेत दिले होते.

Published by: Shreyas
First published: November 19, 2020, 9:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या