सिडनी, 27 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या वनडेदरम्यान दोन आंदोलनकर्ते सुरक्षा तोडून मैदानात घुसल्याचा प्रकार घडला. यातला एका आंदोलन करणारा हातात बोर्ड घेऊन आला होता. या बोर्डवर ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या अडानी समूह (Adani Group) च्या कोळसा प्रकल्पाला विरोध करणारा संदेश लिहिण्यात आला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सीरिजला आजपासूनच सुरुवात झाली. कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर पहिल्यांदाच प्रेक्षकांना मैदानात येऊन मॅच पाहण्याला परवानगी देण्यात आली आहे.
मैदानात नेमकं काय झालं?
नवदीप सैनी सहावी ओव्हर टाकत असताना आंदोलनकर्ते मैदानात उतरले. या आंदोलनकर्त्यांना सुरक्षारक्षकांनी बाहेर काढलं. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेशाची परवानगी दिली आहे.
WATCH: Video of two #StopAdani supporters taking the grounds to protest @TheOfficialSBI's plans to give @AdaniOnline a $1bn (5000 crore) Indian taxpayer loan for Adani's Carmichael coal project #AUSvIND pic.twitter.com/NhY3vPN0HM
— Stop Adani (@stopadani) November 27, 2020
अडानी समुहाचा विरोध का?
ऑस्ट्रेलियात अडानी समुहाचा वाद उत्तर गॅलिली खोऱ्यातल्या खाणीवरुन सुरू आहे. ही खाण ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्यातल्या ब्रिस्बेनपासून उत्तर-पश्चिमेला 1200 किमी लांब आहे. कंपनीला इथला कोळसा भारतात पाठवायचा आहे, पण याला विरोध होत आहे. ऑस्ट्रेलियात आपण 1500 स्थानिकांना रोजगार दिल्याचा दावाही अडानी समुहाने केला आहे. पण ऑस्ट्रेलियातले काही आंदोलनकर्ते हे पर्यावरणविरोधी असल्याचा आरोप करत आहेत.