करिनाचा फोटो ट्विट करत वसीम जाफर म्हणाला, 'बुमराहची बॅट तळपली'
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताची (India vs Australia) अवस्था खराब झाली, पण जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने बॅट्समनना लाजवेल अशी कामगिरी केली. वसीम जाफर (Wasim Jaffer) याने बुमराहच्या बॅटिंगचं कौतुक करणारं ट्विट केलं आहे.
सिडनी, 11 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताची (India vs Australia) अवस्था खराब झाली आहे. कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं नाही, पण दहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने बॅट्समनना लाजवेल अशी कामगिरी केली आणि भारताला 150 रनच्या पुढे पोहोचवलं. जिकडे प्रत्येक भारतीय बॅट्समनला एक-एक रन काढण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, तिकडे बुमराहने अर्धशतकी खेळी केली. टेस्ट क्रिकेटमध्ये 2.9 ची सरासरी असणाऱ्या बुमराहने ऑस्ट्रेलिया ए च्या बॉलिंगचा चांगलाच समाचार घेतला.
जसप्रीत बुमराहची ही बॅटिंग बघून भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने एक ट्विट केलं आहे. यामध्ये जाफर याने करिना कपूरचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. जसप्रीत बुमराहची बॅट तळपली असं कॅप्शन जाफरने या फोटोला दिलं आहे.
या सराव सामन्यात भारताच्या पहिल्या इनिंगमधला बुमराह हा सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला. त्याआधी शुभमन गिल 43 रन करून आऊट झाला होता. तर पृथ्वी शॉ 29 बॉलमध्ये 40 रन करून माघारी परतला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली टेस्ट सीरिज सुरू होण्याआधीची हा शेवटचा सराव सामना आहे. 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे.
Jasprit Bumrah - Test batting average of 2.9 - is smoking them out there!
वसीम जाफर हा त्याच्या ट्विटमुळे वारंवार चर्चेत येऊ लागला आहे. काहीच दिवसांपूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सीरिज जिंकल्यानंतर वसीम जाफरने इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन याच्यावर निशाणा साधला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा सगळ्या सीरिजमध्ये पराभव होईल, असं भाकीत मायकल वॉनने वर्तवलं होतं, पण टी-20 सीरिजमध्ये भारताचा विजय झाल्यानंतर वसीम जाफर याने गॅन्गज ऑफ वासेपूरच्या एका सीनचा फोटो शेयर करून मायकल वॉनला प्रत्युत्तर दिलं होतं.