सिडनी, 27 नोव्हेंबर : टीम इंडिया (Team India) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला वनडे सीरिजने सुरुवात झाली आहे. पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. तर रोहित शर्माच्या गैरहजेरीत भारतीय टीम मयंक अग्रवालला घेऊन खेळत आहे. मॅच सुरू होण्याआधी दोन्ही टीमच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स (Dean Jones) यांना एक मिनीट शांत राहून श्रद्धांजली वाहिली. याचसाठी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहे.
डीन जोन्स यांचं यावर्षीच्या आयपीएलदरम्यान निधन झालं. जोन्स यांनी ऑस्ट्रेलियासाठी 52 टेस्ट आणि 164 वनडे खेळल्या होत्या. आयपीएलच्या अधिकृत प्रसारणकर्त्या वाहिनीच्या कॉमेंट्रीसाठी डीन जोन्स मुंबईमध्ये असतानाच 24 सप्टेंबरला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
जोन्स यांच्या सन्मानासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या सीरिजआधी त्यांना श्रद्धांजली देण्याचं ठरवलं होतं. यावेळी मोठ्या स्क्रीनवर जोन्स यांच्या कारकिर्दीतले निवडक क्षणही दाखवण्यात आले.
#TeamIndia are sporting black armbands to pay their tributes to Dean Jones and in memory of Phillip Hughes, who passed away on this day six years ago.#AUSvIND pic.twitter.com/0O8wJT5VIq
— BCCI (@BCCI) November 27, 2020
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया डीन जोन्स यांना मेलबर्नमधल्या दुसऱ्या टेस्टवेळीही श्रद्धांजली देणार आहे. मेलबर्न हे जोन्स यांचं स्थानिक मैदान होतं, तसंच या मैदानात त्यांना प्रेक्षकांकडून मोठा पाठिंबाही मिळायचा.
ऑस्ट्रेलियातल्या माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार 'बॉक्सिंग डे टेस्टमध्ये डीन जोन्स यांचा मोठा सन्मान केला जाईल. पहिल्या दिवसाच्या चहापानाच्या विश्रांतीवेळी तीन वाजून 24 मिनिटांनी जोन्स यांना श्रद्धांजली दिली जाईल, त्यावेळी जोन्स यांची पत्नी आणि संपूर्ण कुटुंब मैदानात असेल. स्थानिक लेखक क्रिस ड्रिस्कोल यावेळी जोन्स यांच्याबद्दल लिहिलेली कविता वाचतील. याचसोबत संपूर्ण टेस्ट मॅचमध्ये प्रेक्षक बसतात तिकडेही जोन्स यांच्या श्रद्धांजलीचे बॅनर लावले जातील.'
डीन जोन्स यांचा प्रथम श्रेणीमधला सर्वाधिक स्कोअर 324 आहे, त्यामुळे त्यांना तीन वाजून 24 मिनिटांनी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. जोन्स यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 11 शतकांच्या मदतीने 3,631 रन केले, तर वनडे मध्ये त्यांच्या नावावर 6,063 रन आहेत.