सिडनी : जगभरामध्ये कोरोना (Corona Virus) ची भीती पसरली आहे, पण क्रिकेट रसिकांना मात्र याची चिंता सतावत नसल्याचंच दिसत आहे. 27 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. यातल्या वनडे आणि टी-20 सीरिजची तिकीटं विकली गेली आहेत. कोरोना व्हायरसचं संकट असतानाही या दोन्ही फॉरमॅटची तिकीटं फक्त अर्ध्या तासात विकली गेली.
शुक्रवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन वनडे आणि तीन टी-20 मॅचसाठीची ऑनलाईन विक्री सुरू केली होती. ऑनलाईन तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर 30 मिनिटांच्या आत सगळी तिकीटं संपली. पण पहिल्या वनडेसाठीची काही तिकिटं शिल्लक होती.
डे-नाईट टेस्टसाठी 50 टक्के प्रेक्षक
वनडे आणि टी-20 सीरिज संपल्यानंतर टेस्ट मॅचना सुरुवात होणार आहे. 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये डे-नाईट टेस्टला सुरुवात होईल. यासाठी 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहता येणार आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने याला परवानगी दिली आहे. ऍडलेड स्टेडियमची क्षमता 54 हजार आहे, त्यामुळे 27 हजार प्रेक्षक पहिली टेस्ट मॅच बघू शकतात.
मेलबर्नमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचसाठीही 25 हजार प्रेक्षकांना परवानगी असेल. मेलर्बन क्रिकेट स्टेडियमची क्षमता एक लाख आहे, पण प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी व्हिक्टोरिया सरकार आणि मेलबर्न क्रिकेट क्लबने कोरोना सुरक्षा प्लान तयार केला आहे. बॉक्सिंग डे म्हणजेच 26 ते 30 डिसेंबरदरम्यान मेलबर्नमध्ये दुसरी टेस्ट होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे सीरिजला 27 नोव्हेंबरपासून सुरूवात होईल. दुसरी वनडे 29 नोव्हेंबर आणि तिसरी वनडे 2 डिसेंबरला खेळवली जाईल. टी-20 सीरिज 4 डिसेंबरपासून सुरू होईल. दुसरी टी-20 6 डिसेंबर आणि तिसरी मॅच 8 डिसेंबरला होईल. यानंतर 17 डिसेंबरपासून पहिली टेस्ट, 26 डिसेंबरपासून दुसरी टेस्ट, 7 जानेवारीपासून तिसरी टेस्ट आणि 15 जानेवारीपासून चौथी टेस्ट खेळवली जाईल.