IND vs AUS : बॅट न धावता पळालेल्या मोहम्मद सिराजने जिंकली मनं, जाणून घ्या कारण
भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए (India vs Australia) यांच्यातल्या सराव सामन्यात मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने केलेल्या कृतीमुळे क्रिकेट चाहते त्याच्यावर फिदा झाले आहेत.
सिडनी, 13 डिसेंबर : भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए (India vs Australia) यांच्यातल्या सराव सामन्यात मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने केलेल्या कृतीमुळे क्रिकेट चाहते त्याच्यावर फिदा झाले आहेत. सराव सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा बॉलर कॅमरून ग्रीन याच्या डोक्याला बॉल लागला, तेव्हा सिराज रन धावण्याची चिंता न करता, बॅट सोडून ग्रीनची विचारपूस करण्यासाठी पळाला.
कॅमरून ग्रीन बॉलिंग करत असताना जसप्रीत बुमराहने स्ट्रेट ड्राईव्ह मारला. बुमराहने मारलेला हा बॉल ग्रीनच्या डोक्याला जाऊन लागला. बॉल लागल्यामुळे ग्रीन लगेचच खाली बसला. त्यावेळी नॉन स्ट्रायकरला उभा असलेला मोहम्मद सिराज बॅट सोडून ग्रीनच्या दिशेने पळाला आणि ग्रीनला लागलं तर नाही ना, याची त्याने चौकशी केली.
बुमराहचा बॉल लागल्यामुळे कॅमरून ग्रीन या सराव सामन्यातून बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल टीमने ग्रीनवर मैदानातच प्राथमिक उपचार केले, यानंतर ग्रीन स्वत:च चालत ड्रेसिंग रूमच्या दिशेने गेला. मोहम्मद सिराजने रनची आणि स्वत:च्या विकेटची परवा न करता उचललेल्या या पावलाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
पॅट्रिक रोव्ह हा कॅमरून ग्रीन याचा कनकशन सबस्टिट्युट म्हणून मैदानात उतरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियन बॅट्समन विल पुकोवस्की याच्या डोक्यालाही पहिल्या सराव सामन्यादरम्यान बॉल लागला होता. कार्तिक त्यागीने टाकलेला बाऊन्सर पुकोवस्किला खेळता आला नाही. तर ऑस्ट्रेयिचा दिग्गज बॅट्समन डेव्हिड वॉर्नर मांडीच्या दुखापतीमुळे पहिल्या टेस्टला मुकणार आहे. दुसऱ्या वनडेमध्ये वॉर्नरला दुखापत झाली होती.