भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांचं निधन, ऑस्ट्रेलियात असल्याने भारतात येता येणार नाही

भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांचं निधन, ऑस्ट्रेलियात असल्याने भारतात येता येणार नाही

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याच्या वडिलांचं निधन झालं आहे.

  • Share this:

हैदराबाद : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याच्या वडिलांचं निधन झालं आहे. फुफ्फुसाच्या आजारामुळे मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद घाऊस यांचं शुक्रवारी निधन झालं, ते 53 वर्षांचे होते. मोहम्मद सिराजला त्याचे वडिल गेल्याचा निरोप देण्यात आला आहे. सिराज हा टीम इंडियासोबत सध्या सिडनीमध्ये आहे. सराव करून आल्यानंतर सिराजला वडिल गेल्याचं सांगण्यात आल्याचं वृत्त स्पोर्ट्स स्टार या वेबसाईटने दिलं आहे.

देशाचं नाव मोठं कर, असं माझे वडील नेहमी म्हणायचे, मी ते नक्कीच करीन, असं मोहम्मद सिराज स्पोर्ट्स स्टारशी बोलताना म्हणाला. माझ्यासाठी हे धक्कादायक आहे. मी आयुष्यातला सगळ्यात जास्त पाठिंबा देणारा माणूस गमावला आहे. देशासाठी मला खेळताना बघणं हे त्यांचं स्वप्न होतं. मी ते पूर्ण करून त्यांना आनंद दिला, अशी प्रतिक्रिया मोहम्मद सिराजने दिली.

कोरोना व्हायरसमुळे असलेल्या क्वारंटाईनच्या नियमांमुळे मोहम्मद सिराज वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी भारतात येऊ शकणार नाही. आयपीएलच्या या मोसमात मोहम्मद सिराजने उल्लेखनीय कामगिरी केली. 21 ऑक्टोबरला कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये सिराजने विक्रम केला होता. या मॅचनंतर त्याने आपले वडिल आजारी असल्याचं सांगितलं होतं.

'माझे वडील आजारी आहेत. फुफ्फुसाचा आजार झाल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. मला त्यांची काळजी वाटते. मी घरी जाऊन त्यांना प्रोत्साहन देऊ शकत नाही. मी त्यांच्याशी फोनवर बोलतो, पण ते रडायला सुरूवात करतात. त्यामुळे मी फोनवर त्यांच्याशी जास्त बोलू शकत नाही. त्यांना रडताना मला बघवत नाही. त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करा,' असं सिराज म्हणाला होता.

वडिलांनी रिक्षा चालवून शिकवलं

मोहम्मद सिराजचा क्रिकेटसाठीचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला. हैदराबादमधल्या गरिब कुटुंबामध्ये सिराजचा जन्म झाला. सिराजच्या वडिलांनी रिक्षा चालवून कुटुंब चालवलं. पण रिक्षाचालक असूनही त्यांनी सिराजला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही. सिराजला क्रिकेट खेळण्यासाठी लागणाऱ्या वस्तू त्यांनी नेहमी आणून दिल्या. मोहम्मद सिराज दिवसभर क्रिकेटचा सराव करायचा, एवढच नाही तर कित्येक वेळा रात्रीही सराव केल्यामुळे सिराजला आईचा मारही खावा लागला.

Published by: Shreyas
First published: November 20, 2020, 8:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या