सिडनी, 25 नोव्हेंबर : टीम इंडिया (India vs Australia) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने भारतात परतण्याआधी मर्यादित ओव्हरच्या सीरिजमध्ये टीमला लय मिळवून दिली नाही, तर टेस्ट सीरिजमध्ये त्यांचा 4-0 ने पराभव होईल, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्क (Michael Clarke) याने केलं आहे.
मायकल क्लार्क स्काय स्पोर्ट्स रेडिओशी बोलत होता. टीम इंडियाला वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये यश मिळालं नाही तर टेस्ट सीरिजमध्ये त्यांना अवघड जाईल. त्यांना 4-0ने पराभवही पत्करावा लागू शकतो, असं मायकल क्लार्क म्हणाला.
विराट कोहली फक्त एक टेस्ट मॅच खेळणार असला तरी मर्यादित ओव्हरच्या सीरिजमध्ये तो मोठं आव्हान उभं करू शकतो. या टीमला विराट वनडे आणि टी-20 मध्ये जी सुरुवात देईल, ती टेस्ट सीरिजसाठी महत्त्वाची असेल, अशी प्रतिक्रिया क्लार्कने दिली. विराटसोबतच जसप्रीत बुमराहची भूमिकाही या दौऱ्यात महत्त्वाची असेल, असं क्लार्कला वाटतं.
'बुमराह जलद बॉलिंग करतो, त्याची एक्शनही वेगळी आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनना त्याच्याविरुद्ध आक्रमक बॅटिंग करायची गरज आहे. बुमराह डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथला अडचणीत आणू शकतो. बुमराह किती विकेट घेतो यापेक्षा तो कशी बॉलिंग करतो, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. वॉर्नरविरुद्ध त्याला यश येत आहे, त्याने वॉर्नरला बरेच वेळा आऊट केलं आहे. तसंच बुमराह स्मिथविरुद्ध शॉर्ट पिच बॉलिंग करून यशस्वी राहिला. जोफ्रा आर्चरनेही ऍशेसमध्ये तेच केलं,' असं क्लार्कने सांगितलं.
भारताकडून विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला पुढे येऊन जबाबदारी घ्यावी लागेल. भारताने 2018-19 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदाच भारताने टेस्ट सीरिज जिंकून इतिहास घडवला होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे, टी-20 सीरिज आणि पहिली टेस्ट मॅच खेळून विराट भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट हा दौरा अर्धवट सोडणार आहे. विराटच्या अनुपस्थितीमध्ये भारत तीन टेस्ट मॅच खेळणार आहे.